आरवली : ग्रामीण भाग हा देशाचा मुख्य कणा आहे. ग्रामीण भागात गाव विकासासाठी येणाऱ्या सरकारी योजना आणि आर्थिक निधीच्या नियोजनाबाबत गावातील ग्रामस्थांनी जागरूक व्हावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधि कक्ष विभागाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय पाटील यांनी व्यक्त केले.
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे-सोनगिरी समन्वय युवा सामाजिक संघटनेतर्फे कोळंबे येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मनसेचे जनहित व विधि कक्ष विभागाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
हे शिबिर प्रशासकीय आणि ७/१२ वाचन, फेरफार आणि ग्रामपंचायत अधिनियम या विषयावर आयोजित करण्यात आले होते. अजय पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले.
तसेच शेत जमिनीबाबत असणाऱ्या अनेक समस्या, कूळ कायदा, तलाठी व तहसीलदार यांच्यातर्फे लोकांची होणारी फसवणूक, त्यासाठी ७/१२ वाचन आणि फेरफार याबाबतही मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी नावडी विभागातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.