राजापूर : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्थानकाने आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन तेथे घरा-घरात जाऊन तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजापूर पोलीस स्थानकाने हातिवले, तर नाटे पोलीस ठाण्याने दळे गाव दत्तक घेतले आहे.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाच, आता पोलीस स्थानकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन तेथील घरा-घरात जाऊन जनतेची तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक पोलीस स्थानकात धडकले आहेत. त्यानुसार राजापूर पोलीस स्थानकाने हातिवले गाव, तर नाटे पोलीस स्थानकाने दळे गाव दत्तक घेतले आहे.
दतक गाव घेतल्यानंतर तपासणीसाठी जाणाऱ्या पोलिसांच्यासमवेत आरोग्य विभागाचा कुणी कर्मचारी देण्यात आलेला नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळताना आता पोलिसांना आरोग्य सेवेचेही काम करावे लागणार आहे. हातिवले गावात गेल्या काही दिवसांत जवळपास पन्नासच्या आसपास कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दळेमधील वरच्या सड्यावर एक-दोन रुग्ण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महामार्गावरील हातिवले येथील तपासणी नाक्यावर केवळ पोलीस दलाचेच कर्मचारी कार्यरत असून, अन्य कर्मचारी कार्यरत नसल्याची बाब समाेर आली आहे.