रत्नागिरी : लॉकडाऊनकाळात भावना, संवेदना व कल्पकता याची अप्रतिम बांधणी करून सौंदर्यनिर्मिती केल्याबद्दल चित्रकार विनय माळी यांचा महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघातर्फे गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कलाकृती प्रेरणादायी व आनंददायी ठरल्याने हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे राज्य कलाध्यापक संघाचे अध्यक्ष बबन तिवडे यांनी सांगितले.
समाजरत्न पुरस्कार
चिपळूण : तालुक्यातील कौंढे-पाचाड येथील ग्रामसेवक मंगेश पांचाळ यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली येथील लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पांचाळ यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
लसीकरणाची मागणी
रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहे. त्यातच लसीकरण केंद्रांवर तासन् तास उभे रहावे लागत होते. डोस कमी येत असल्याने ताटकळत उभे राहूनही लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी यांनी केले आहे.
वाढीव लाकूडसाठा
खेड : कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी गैरसोय होऊ नये याकरिता नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत लाकडाचा साठा वाढविण्यात आला आहे. गेल्या १३ दिवसांत तब्बल २१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या १२६ वर पोहोचली आहे.
पाणीपुरवठा पूर्ववत
राजापूर : पाणीटंचाईमुळे शहरातील पाणीपुरवठा ५ एप्रिलपासून १ दिवसाआड करण्यात आला होता. १४ मेपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा जाहीर करण्यात आला होता. मात्र, १६ मे रोजी झालेल्या पावसामुळे कोदवली धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे १८ मे पासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे.
सहा पथके कार्यरत
खेड : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सागरी किनारपट्टीवरील गावामध्ये त्याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यासाठी खेड विभागातील महावितरणची सहा पथके कार्यरत आहेत. हर्णै, पाजपंढरी, केळशी, दाभोळ आदी गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
बसस्थानक मार्गावर चिखल
राजापूर : चक्रीवादळामुळे तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने राजापूर बसस्थानक, कोदवली, साईनगर, शीळ मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलामुळे पादचारी व वाहनचालक यांना त्रास होत आहे. पादचाऱ्यांना चिखलातून ये-जा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
औषध साठा
रत्नागिरी : मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांनी राज्यातील काही कोरोना केंद्रांना औषधे व संरक्षण सामग्री वितरीत केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती निमेश नायर आणि मातोश्री ट्रस्टचे जिल्हा अध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद कोविड केंद्रामध्ये औषध साठा व अन्य साहित्य वितरीत करण्यात आले आहे.
आरोग्य केंद्राला मदत
चिपळूण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या येथील शाखेतर्फे सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला मदतीचा हात देण्यात आला. कोरोना कालावधीत शासन यंत्रणा, आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा अनेक सामाजिक संघटना व सेवाभावी संस्था विशेष परिश्रम घेत आहेत. हॅण्डग्लोव्हज, मास्क, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
संचारबंदीतील उपस्थिती
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातील नियमित समय वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना संचारबंदीतील उपस्थिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. महामंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे संचारबंदीतील उपस्थिती देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.