आरोग्य केंद्राचा आढावा
लांजा : तालुक्यातील रिंगणे, भांबेड, वाडीलिंबू, जावडे व शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन त्यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व कोरोना लसीकरणाबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी चंद्रकांत मणचेकर, मानसी आंबेकर, मारुती कोरे आदी उपस्थित होते.
निर्जंतुकीकरण
दापोली : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील नवशी-शिरशिंगे ग्रामपंचायतीचे सदस्य मिलिंद गोरिवले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
ग्रामसेवकांचा सहभाग
रत्नागिरी : जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यापासून ते अगदी ग्रामस्थांना लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी ते कार्यरत आहेत. गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पाडत आहेत.
पीपीई किटचे वाटप
चिपळूण : शहर व परिसरातील कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पीपीई किटचे वाटप करण्यात आले. या वेळी सावर्डेचे उपसरपंच जमीर मुल्लाजी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी उपस्थित होते.
बालसंस्कार शिबिर
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयात मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ११ दिवसांचे ऑनलाइन बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. चित्रकला, रांगोळी, मेहंदी, वादन, गायन असे विविध उपक्रम घेण्यात आले.
रस्त्याचे काम रखडले
रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी रस्ता नूतनीकरण काम पूर्णत्वास गेले असले तरी मेर्वी बेहरे टप्पा दरम्यान रस्त्याच्या चाैपदरीकरणाच्या नावाखाली नूतनीकरणाचे काम रखडले आहे. दीड किलोमीटरचा रस्ता तसाच ठेवल्याने वाहनचालक, ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पशुसंवर्धन योजनेचा लाभ
चिपळूण : माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्या पूजा निकम यांनी सावर्डे धनगरवाडी विभागातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडील योजनेचा लाभ मिळवून दिला. पंचायत समिती सेस फंडांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर साहित्य वाटप करण्यात आले.
आरोग्यविषयक सर्वेक्षण
चिपळूण : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘माझा जिल्हा, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी सरप्राईज व्हिजिट देत कामाचा आढावा घेतला.
लिंबूसाठी मागणी
रत्नागिरी : तीव्र उन्हाळ्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे थकवा वाढतो. ‘क’ जीवनसत्त्व मुबलक असल्याने लिंबूपाणी सेवन प्राधान्याने केले जात असल्याने लिंबूसाठी विशेष मागणी होत आहे. १० रुपयांना दोन ते तीन नग दराने विक्री सुरू आहे.