लांजा
: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. या समाजाचा राजकारणासाठी वापर करुन फेकून देण्याचे काम केल्याने अजूनही त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजाचे प्रश्न सोडवले न गेल्यास कोकणामध्ये उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांनी लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. त्यांनी सांगितले की, अद्यापही धनगर बांधवांना रस्ते, पाणी, शाळा, घरे, वीज आदी सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. धनगरवाड्यावर असलेल्या शाळा पटसंख्या कमी असल्याने बंद करण्यात आल्या आहेत. अद्यापही रस्ते व विद्युत पुरवठा नसल्याने येथील समाज बांधव खितपत पडलेला आहे. या समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने ७ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याचे काम महासंघ करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय गोरे, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष संदीप गोरे, रत्नागिरी युवक आघाडी अध्यक्ष अमृत गोरे, लांजा तालुकाध्यक्ष संजय गोरे, लांजा तालुका युवक अध्यक्ष जयवंत गोरे, संगमेश्वर तालुका संघटक मंगेश वरक, संगमेश्वर तालुकाध्यक्ष सागर वरक, लांजा तालुका संघटक गणेश लांबोर, राजापूर तालुकाध्यक्ष सुरेश कोकरे, राजापूर तालुका संघटक सचिन घौगुले, सातारा सोशल मीडिया अध्यक्ष विजय यमकर उपस्थित होते.