रत्नागिरी : विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाने येथील आजगावकर वाडी येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत टाळ-मृदंगांच्या गजरात पायी दिंडी काढली. हे अनोखे भजनी आंदोलन केल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वारकरी व कार्यकर्त्यांनी पारंपरिक गोल रिंगण करून हरिनामाचा गजर केला.
शासनाने वारीला निर्बंध घातले आणि ज्येष्ठ वारकरी बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केले याचा निषेध म्हणून ही वारी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे. या सर्व प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात सरकारी पूजेसाठी येऊ नये. वारकरी सप्ताह, कीर्तन, प्रवचने, दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावेत. कार्यालय, बस प्रवास, हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीला मान्यता दिली आहे, तशी या अनुष्ठानांना अनुमती द्यावी. आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध भागांत विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपरिक उत्सव सुरू करावेत. बंडातात्या कराडकर यांना व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, तसेच त्यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत.
राज्य सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनात दिला आहे.
यावेळी विंहिप विभाग मंत्री अनिरुद्ध भावे, रत्नागिरी जिल्हा मंत्री विवेक वैद्य, सहमंत्री वल्लभ केनवडेकर, बजरंग दल संयोजक अभिषेक माने, दुर्गा वाहिनी संयोजिका वृषाली सुर्वे, लांजा अध्यक्ष दादा रणदिवे, गुहागर अध्यक्ष सोलकर महाराज, प्रखंड मंत्री बबन कुंभार आदी उपस्थित होते.