जवान मानधनाविना
खेड : कोरोनाच्या संकटात पोलिसांच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना गेल्या तीन - चार महिन्यांचे मानधनच मिळालेले नाही. मानधन नसतानादेखील हे जवान प्रामाणिकपणे कर्तव्य निभावत आहेत. पोलिसांच्या दिमतीला नेहमीच गृहरक्षक दलाचे जवान तैनात असतात. कोरोनाच्या संकटातही गृहरक्षक दलाच्या जवानांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
शाळा झाली डिजिटल
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम टेक्नाॅलॉजी कंपनीच्या माध्यमातून सोनगाव - माठ मराठी शाळा संपूर्ण डिजिटल झाली आहे. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रामराव गायकवाड, अमोल अकुलकर यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक शिवराम कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश नायनाक आदी उपस्थित होते.
विकासकामांचे भूमिपूजन
दापोली : तालुक्यातील महाळुंगे ग्रामपंचायत दुरुस्ती भूमिपूजन व महाळुंगे - गोपाळवाडी ते स्मशानभूमी रस्ता खडीकरण भूमिपूजन कार्यक्रम दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिपळुणात डेमो हाऊसचे भूमिपूजन
चिपळूण : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने महाआवास अभियान राबवले जात आहे. या अभियानातून बांधण्यात येणारी घरे कशा स्वरूपात असतील, या डेमो हाऊसचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले. बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात राबवली जात असून त्यासाठी चिपळूण पंचायत समितीला यंदा १४३ घरे बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही घरे बांधण्यासाठी लाभार्थींना दीड लाखापर्यंत निधी उपलब्ध होत आहे.
चिपळूण उपनगराध्यक्षांसाठी केबिन
चिपळूण :- येथील नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या मागणीनुसार पहिल्या माळ्यावर हक्काचे केबिन मिळाले आहे. सोमवारी त्यांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व सभापती, नगरसेवक यांच्या उपस्थितीत केबिनचा ताबा घेतला. मात्र, यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
खरवते - ओमळी रस्त्याची झालेली दुरवस्था
चिपळूण : तालुक्यातील खरवते गांधी दुकान ते ताम्हणमळा दरम्यानच्या गोपाळकृष्ण गोखले मार्गाची दुरवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या पंचक्रोशीतून होत आहे. खरवते ते ओमळी, नारदखेरकी, ताम्हणमळा या गावांतील हा रस्ता आता केवळ शोभेचा राहिला आहे. या रस्त्यावरील खडी निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
संस्कृत संभाषण वर्ग
चिपळूण : संस्कृतभारती कोकण प्रांताच्या वतीने शहरातील डीबीजे महाविद्यालयात ८ ते १८ एप्रिलदरम्यान सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत तर बापटआळी येथील माधवबाग (संघ कार्यालय) येथे ९ ते १८ एप्रिलदरम्यान सकाळी १० ते दुपारी १२ वाजेतर्यंत तालुकास्तरीय संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्ग पूर्णतः मोफत आहे.
चंद्रनगर शाळेत होलिकोत्सव साजरा
दापोली : चंद्रनगर शाळेतील होळीचा उत्सव पार पडला. शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच होळी करणे, शिमगा करणे यांसारख्या वाक्प्रचारांचा शब्दश: अर्थ व त्यामागचा विशाल मतितार्थ कळावा यासाठी शाळेतील विषय शिक्षक बाबू घाडीगावकर व मनोज वेदक यांच्या नियोजनातून होलिकोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
केक मेकिंग प्रशिक्षण
चिपळूण : - तालुक्यातील कोंढे येथे मुलींसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केक मेकिंग प्रशिक्षण पार पडले. जवळपास ३५ ते ४० महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. जिवाजी बाबूराव राणे या संस्थेतर्फे महिलांमध्ये स्वयंरोजगार उभा राहावा म्हणून नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण गरजू महिलांना देण्यात येते.
तायक्वाँदो स्पर्धेत यश
चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल पब्लिक स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत यश संपादन केले. साई तायक्वाँदो खेड व खेड तायक्वाँदो स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत २० किलो वजनी गटात दीप सैतवडेकर याने सुवर्णपदक, ५० किलो वजनी गटात ओम पटेल याने रौप्यपदक तर ५५ किलो वजनी गटात श्रावणी साळवी हिने रौप्यपदक पटकावले.
दशरथ राणे यांचा सत्कार
चिपळूण : नाटककार दशरथ राणे यांच्या ‘बायको असून देखणी’ या ५० व्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ २००७ साली शाहीर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते झाला आहे. त्यांचा या लेखनाबद्दल नुकताच खासदार विनायक राऊत, माजी आमदार गणपत कदम, आमदार राजन साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.