रत्नागिरी : गेले ४४ वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यावर्षीची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वत:चे महत्त्व जपणारी अशी आहे.
महासदाशिव असे हे श्री गणेशाचे रूप रत्नागिरीतील मूर्तिकार सुशील कोतवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे. मंगळवार, २८ जानेवारी रोजी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.मारूती कॉमन क्लबच्या उत्सवात असलेली श्रींची मूर्ती अत्यंत वेगळी आणि चित्ताकर्षक आहे. २५ मुखं आणि ५० हात असलेली ही श्रींची मूर्ती पाहताक्षणी आपल्या मनात अनेकविध प्रश्न उपस्थित करते.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ही मूळ महासदाशिवाची मूर्ती आहे. हा शंकर कैलास पर्वतात वसलेला असून, याला २५ मुखं आणि ५० हात आहेत. म्हणून त्याला ह्यमहासदाशिवह्ण म्हणतात. त्याचबरोबर याच्या आजूबाजूला कैलास पर्वतामध्ये अजून निरनिराळ्या २५ मूर्ती आहेत. रुथरास, सिद्धास, साजे हे तिघे त्या महासदाशिव मूर्तीची पूजा करतात.पुराणातून असे समजते की, हा २५ मुखी सदाशिव कैलासात आहे. तो आपले आशीर्वाद सगळ्या जीवांना दानाच्या स्वरूपात देतो, म्हणून त्याला अनुग्रह मूर्ती असेही म्हणतात. अजूनही या मूर्तीचा आकार-उकार समजला नाहिये. मूर्तीचे शरीर अनेक प्रकार एकत्र येऊन तयार झाले आहे. या महासदाशिवाची पूजा केली जाते ती कांचीपूरममध्ये.
या महासदाशिवाची मूर्ती कोणत्याही मंदिरात नसून ती तामिळनाडू राज्यातील जिल्हा कन्याकुमारी येथील सुचिंद्रम पंचायत शहरातील सुरांगरेश्वर या मंदिराच्या गोपुरावर आहे. अशाच अनेक मंदिरांच्या गोपुरावर हा सदाशिव आहे. असे मानतात की, याची पूजा-अर्चा केली की हा महासदाशिव प्रसन्न होतो. खूप ताप असल्यावर या महासदाशिवाला ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने ताप कमी होतो, असेही सांगण्यात येते.या २५ मुखी श्री गणेशाचा उत्सव मंगळवार दि. २८ जानेवारीपासून सुरू होत असून, रत्नागिरीतील खालची आळी येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.