हर्षल शिरोडकरखेड : सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी भाजपने राज्यातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी केंद्रीय मंत्री लोकसभा मतदार संघांचा दौरा करत असून, सोमवार (दि. २२; पासून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रायगड लोकसभा मतदार संघाचा दौरा खेडमधून सुरू केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दूर ठेवले.रविवारी (दि.२१) मंत्र्यांचे खेडमध्ये आगमन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या १६ मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष दिले असून, नऊ केंद्रीय मंत्री या मतदारसंघांत ठाण मांडणार आहेत. पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहावेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत. यानुसार रायगड आणि शिर्डी मतदार संघाची जबाबदारी प्रल्हाद पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.प्रत्येकी तीन दिवसांच्या या दौऱ्यात २१ कार्यक्रमांची रचना करण्यात आली असून, या काळात पक्षीय बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत. रायगड मतदार संघात भाजपची ताकद अत्यल्प आहे. मात्र, शिवसेनेने पडलेल्या फुटीमुळे आगामी निवडणुकीत चमत्कार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या दौऱ्यात केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, धार्मिक स्थळांना भेटी, आध्यात्मिक गुरूंच्या गाठीभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी, सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, व्यापारी, वकील, डॉक्टरांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद, सर्व स्तरावरील संघटनात्मक, शासकीय अधिकारी यांच्या बैठका तसेच स्वस्त धान्याच्या दुकानांतही भेट देणे अपेक्षित आहे.मात्र, पटेल यांनी पत्रकार संवाद साधलाच नाही. केंद्र सरकारकडून राबवविलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत नीटपणे पोहोचत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री जागोजागी जातील व आपल्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या जिल्ह्यातील कार्यवाहीविषयी माहिती देतील अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा त्यांच्या पहिल्या वहिल्या दौऱ्यात फोल ठरल्या आहेत.
केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदारसंघात दौरे; मात्र, प्रसारमाध्यमांचे वावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 6:18 PM