साखरपा : दाभोळे येथे भारतीय जनता पक्षातर्फे विविध व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपचे काशिनाथ सकपाळ व पंकज देवळेकर यांच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन केले होते. कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, शोभिवंत मत्स्यपालन, आदी व्यवसायांची माहिती देण्यात आली.
मसाला पीक मार्गदर्शन
दापोली : येथील उद्यानविद्या महाविद्यालय व विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालयातर्फे मसाला पिके उत्पादन, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया विषयांवर दोन दिवसांचे जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हळदीच्या एकूण ३२ जाती प्रदर्शित केल्या होत्या. दालचिनी, काळी मिरी, कोकम, वेलची, लवंग, आले, हळद मसाला पिके लागवडीची माहिती देण्यात आली.
नौका तपासणी मोहीम
रत्नागिरी : येथील साहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांच्या पथकातर्फे मिरकरवाडा बंदरात अचानक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सागरी मासेमारी अधिनियमानुसार आवश्यक असणारी मासेमारी नौकांची कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. मासेमारी परवाना, बंदर परवाना, जाण्यासंबंधी कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
मोहिते यांची निवड
देवरुख : भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा संगमेश्वरच्या अध्यक्षपदी राहुल मोहिते यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी विजय मोहिते, खजिनदार मनोहर मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नूतन कार्यकारिणीची सभा घेण्यात आली. हिशेब तपासनीस म्हणून वाय. जी. पवार, कार्यालयीन सचिव अमर पवार यांची निवड करण्यात आली.
जत्रोत्सव साधेपणाने
चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथील सार्वजनिक होलिकोत्सव व त्रैवार्षिक समा जत्रोत्सव या वर्षी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. या देवस्थानच्या शिमगोत्सवाला उसळणारी गर्दी टाळण्यासाठी व शासकीय नियमावलीचे पालन करीत शिमगोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्देशांक फलक
देवरुख : ग्रामपंचायतीमध्ये आता संबंधित गावांचे जमीन सुपीकता निर्देशांक फलक लागणार आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तशा सूचना प्रत्येक ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमाचा द्वितीय स्तर पूर्ण झाला आहे. या स्तरात तपासणी केलेल्या जमिनीच्या परीक्षेचा अहवाल संगणक प्रणालीवर उपलब्ध केला आहे.
वेतनाचा प्रश्न जटील
रत्नागिरी : कोरोनामुळे ग्रामपंचायतीची करवसुली १०० टक्के झालेली नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर नियमित आवश्यक खर्चांसाठी ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे शाळा, अंगणवाड्यांची वीज बिले भरणे हा ग्रामपंचायतींसमोर जटील प्रश्न झाला आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे या वर्षीही काजूचा दर घसरला असून, १०० ते १०५ रुपये प्रतिकिलो दराने काजू विक्री सुरू आहे. दोन वर्षापूर्वी काजूचा दर १५५ ते १६० रुपये प्राप्त होत होता. मात्र गेली दोन वर्षे काजूच्या दरात कमालीची घसरण झाली असून, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
अभिनव उपक्रम
मंडणगड : तालुक्यातील कुंबळे केंद्रशाळेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘गाव तिथे शाळा, शाळा तिथे बालसारस्वत’ हा पहिला उपक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संदीप तोडकर, अमोल दळवी, संगीता पंदीरकर, संजय करावडे, कुंडलिक शिंदे, आदी उपस्थित होते.
महाडिक यांची निवड
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी माजी अध्यक्ष रचना महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महिलेला प्रथम स्थानी संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या अभ्यासू सदस्या तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविताना सभागृहात अभ्यासपूर्ण विषय मांडण्यासाठी त्यांची ओळख आहे.