रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुनरिक्षण कार्यक्रम विविध टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर २०२१ रोजी, तर अंतिम यादी ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कडून घरोघरी भेट देऊन तपासणी-पडताळणी करणे. योग्यप्रकारे विभाग-भाग तयार करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, आदी टप्पे होणार आहेत.
या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर हरकती व दावे १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकती व दावे २० डिसेंबर २०२१ पर्यंत निकाली काढून त्यावर निर्णय घेण्यात येईल. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
मतदार यादीत नाव दाखल करणे यासाठी नमुना ६, अनिवासी भारतीयाचे नाव मतदार यादीत दाखल करणे यासाठी नमुना ६अ, मतदार यादीतील नाव वगळणे यासाठी नमुना ७, मतदार यादीतील मतदाराचे तपशिलात दुरुस्ती करणे साठी नमुना ८, मतदाराचा निवास बदलल्यास विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भाग बदलणे साठी ८अ असे नमुने मतदार यादीचे अद्यावतीकरण करण्यासाठी वापरले जातात.
हरकती व दावे सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसील कार्यालय रत्नागिरी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील. रत्नागिरी विधानसभा मतदार संघामधील मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे, नाव वगळणे, नावात बदल अथवा दुरुस्ती करणे, पत्त्ता बदलणे यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत योग्य तो अर्ज नमुना भरावा. हे अर्ज www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरता येतील. मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी रत्नागिरी तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केले आहे.