लांजातील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना विरोधी भूमिका भोवली, पक्षाने पाठविली नोटीस
By अरुण आडिवरेकर | Published: April 25, 2023 06:20 PM2023-04-25T18:20:12+5:302023-04-25T18:20:32+5:30
उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी केले विराेधात मतदान
अनिल कासारे
लांजा : लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी विराेधात मतदान करणे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. विरोधी पक्षाला मदत केल्याचा ठपका ठेवत रफिक नेवरेकर व मधुरा लांजेकर या दाेन नगरसेवकांना तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लेखी उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेनेमध्ये ठाकरे व शिंदे असे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी आपल्या मर्जीतील नगरसेवकांना सोबत घेऊन शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्तापित केले. मात्र, ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा असलेल्या पूर्वा मुळ्ये तटस्थ राहिल्या. त्यामुळे यांना पदावरून हटवण्यासाठी दि. १७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविराेधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. अविश्वास ठरावावेळी शिंदे गटाचे नगरसेवक, अपक्ष, भाजप, काँग्रेस असे एकूण १३ नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.
काँग्रेसचे नगरसेवक रफिक नेवरेकर व मधुरा लांजेकर यांनी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना कोणतीच पूर्वकल्पना व विश्वासात न घेता विरोधी पक्षाला मतदान करून सहकार्य केले. पक्षविराेधी भूमिका घेतल्याने काँग्रेस तालुकाध्यक्षांनी दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.