रत्नागिरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत २०१३-१४ मध्ये चिपळूण तालुक्यातील वहाळ, कोसबी व संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. संबंधित गावांना लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते धनादेश देऊन गौरविण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ गावाला ३ लाख, कोसबी गावाला १ लाख, तर संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गावाला अडीच लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. तंटामुक्त पुरस्कारासाठी कोसबी, वहाळ तर शांतता पुरस्कारासाठी शेंबवणे गावाची निवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानास २००७ साली प्रारंभ झाला. गावामध्ये तंटे उद्भवू नयेत शिवाय गाव पातळीवरच तंटे मिटवले जावेत, कोर्टकचेरीची प्रकरणे कमी होऊन गावातील व वाडीतील वाद सामोपचाराने ग्रामपंचायत पातळीवरच मिटविले जावेत, यासाठी तंटामुक्त अभियान शासनातर्फे सुरु करण्यात आले. तंटामुक्त समितीने गावातील अनेक प्रकरणे सामोपचाराने मिटवली. त्यामुळे न्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत झाली. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले वाद तंटामुक्त समितीने सोडवले आहेत. तंटामुक्त गाव होण्यासाठी २०० गुणांपैकी १५० गुणांची आवश्यकता आहे. १९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीना मिळणाऱ्या पुरस्काराच्या रक्कमेत २५ टक्के इतकी वाढीव रक्कम विशेष शांतता पुरस्कार म्हणून देण्यात येते. राज्यातील दोन हजार १४३ गावांनी स्वयं मूल्यमापनानुसार तंटामुक्त झाल्याचे घोषित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त घोषित झाल्या आहेत. पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे पुरस्काराचा धनादेश देऊन गौरवण्यात येणार आहे. गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी तंटामुक्त समित्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे. (प्रतिनिधी)
वहाळ, कोसबी, शेंबवणेला तंटामुक्तीचा पुरस्कार
By admin | Published: March 22, 2015 12:32 AM