लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प अंतर्गत (१०८ रुग्णवाहिका) जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका अहर्निश रुग्णसेवा देत आहेत. अपघातातील जखमी, गंभीर आजारांचे रुग्ण, प्रसूती यांच्याबरोबरच आता कोरोनाकाळात कोरोना रुग्णांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे काम १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी दिवसरात्र करीत आहेत. सध्या जिल्ह्यात रुग्ण वाढले असल्याने इतर रुग्णांबरोबरच या रुग्णांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
जिल्ह्यात १०८ नंबरच्या १७ रुग्णवाहिका पुण्यातील बी. व्ही. जी. ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करीत आहेत. या मोफत सेवेचा लाभ शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेलाही होत आहे. जानेवारी २०१४ ते मार्च २०२१ या कालावधीत या रुग्णवाहिकांनी तब्बल १ लाख १६ हजार ७७२ जणांना वेळेवर रुग्णालयात दाखल करून कोरोनासह अन्य उपचार उपलब्ध करून दिले; तर गेल्या साडेतीन महिन्यांत २०९७ कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून नवजीवन दिले आहे.
मात्र, रुग्णवाहिका केवळ १७ असल्याने सध्या कोरोनाकाळात अधिक ताण येत आहे. अपघातातील जखमी, प्रसूती तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याने त्याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरतच आहे. मात्र, रुग्णांचा काॅल येताच तातडीने दाखल होण्यासाठी या सेवेचे कर्मचारी धोका पत्करून सेवा देत आहेत.
ग्रामीणमधून १०८ रुग्णवाहिकेला आहे मागणी
१०८ रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा असल्याने या रुग्णवाहिकेला अपघातातील जखमींनाही उपचारासाठी तातडीने अपघातस्थळी जाऊन रुग्णालयात आणावे लागते. ही सेवा मोफत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला या रुग्णसेवेचा आधार घ्यावा लागतो. विशेषत: प्रसूतीसाठी मातेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. सध्या काेरोनाची संख्या ग्रामीण भागातही वाढू लागल्याने सध्या ग्रामीण भागातूनही या सेवेची मागणी होत आहे.