लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : पाझर तलावासाठी तब्बल १० हेक्टर जमिनीचे भूसंपादन १९९० मध्ये झाले. १९९४ मध्ये तो पूर्णही झाला. मात्र ज्यांची जमीन या तलावासाठी घेतली गेली, त्या ३२ भूधारकांपैकी एकालाही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तब्बल ३० वर्षे लोकांची जमीन वापरून त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले गेल्याचा हा प्रकार दापोली तालुक्यातील करंजाळी कोंड येथील पाझर तलावाबाबत झाला आहे. या भूमिपुत्रांना जमिनीचा ना मोबदला मिळाला ना प्रकल्पग्रस्ताचे दाखले. आपल्या हक्काच्या मागणीसाठी लढा देणारे काहीजण आज हयातही नाहीत.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दापोली तालुक्यातील करंजाळी येथे १९९० मध्ये करंजाळी कोंड पाझर तलावाचे काम सुरू झाले. हे काम १९९४ मध्ये पूर्णही झाले. या तलावासाठी करंजाळी या महसुली गावातील ३२ खातेदारांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. ३० वर्षे उलटल्यानंतरही त्या खातेदारांना अद्यापही जमिनीचा मोबदला देण्यात आलेला नाही. ज्या खातेदारांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत, त्यातील काहीजण भूमिहीन झाले, तर काही अल्पभूधारक झाले. अशांना प्रशासनाने प्रकल्पग्रस्ताचे दाखलेही दिलेले नाहीत. त्यामुळे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यापैकी काहीजण सुशिक्षित असले, तरी त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळालेली नाही. अनेकांची आता नोकरीच्या पात्रतेची वयोमर्यादाही उलटून गेली आहे.
जमिनीचा मोबदला आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळावा, यासाठी या लोकांनी खूपवेळा प्रयत्न केले. सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. उपोषणाचा मार्गही वापरून झाला. मात्र आजवर आश्वासनापलीकडे प्रकल्पग्रस्तांच्या पदरात काहीही पडलेले नाही.