रत्नागिरी : कोरोनामुळे दरवर्षी मार्चमध्ये एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमबीए-एमएमएस सीईटीची अद्याप तारीख ठरलेली नाही. त्यामुळे यावर्षी ही परीक्षा नेमकी केव्हा होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पार पडणाऱ्या एमबीए प्रवेश परीक्षेबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. पदवी परीक्षांचे निकाल लांबले असल्याने परीक्षेची तारीखही उशिरा जाहीर केली जाणार असल्याची शक्यता आहे. गतवर्षी एमबीएची प्रवेश परीक्षा दि. १४ आणि १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. मार्च संपला तरी यावर्षी अद्याप तारीख जाहीर झालेली नाही.
सीईटीच्या माध्यमातून एमबीए अभ्यासक्रमांच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयात प्रवेश केले जातात. गतवर्षी सीईटीनंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामुळे प्रवेश उशिरा झाले होते. यावर्षी पदवी परीक्षा अद्याप झालेली नाही तसेच सर्वच विद्यापीठात पदवी प्रवेश उशिरा झाल्याने परीक्षांची तयारी सुरू झाली आहे. परीक्षेनंतर निकाल जाहीर होण्यास विलंब होणार असल्याने एमबीए प्रवेश सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे.