प्रकाश वराडकर -- रत्नागिरी --कुवारबाव शिक्षण प्रसारक मंडळच्या शाळा इमारतीसाठी कुवारबाव विठ्ठल मंदिरजवळील ९ गुंठे जागा संस्थेने मागितली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून कोकण आयुक्तांकडे गेला. त्यालाही मंजुरी मिळून अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या महसूल खात्याकडे पाठवण्यात आला. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की, ही जागा मंजुरीची कागदपत्र संस्थेला लवकरात लवकर मिळावी. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमिक शाळा इमारतीला चांगले रुप मिळेल व कुवारबाववासीयांना दर्जेदार शिक्षण देणारी माध्यमिक शाळा मिळेल, असा विश्वास या संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर मयेकर व संचालक विनायक हातखंबकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. जागेअभावी शाळेची इमारत उभी राहू शकली नाही व इमारत नाही म्हणून विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर कोणत्याही स्थितीत ही शाळा बंद पडू द्यायची नाही, असे ठरवून संचालकांनी कुवारबाव उत्कर्षनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकडेही एक प्रस्ताव दिला होता. या शाळेत काही खोल्या रिकाम्या होत्या. त्यामुळे संस्थेची जागेची समस्या लक्षात घेऊन वर्षभरासाठी भाडेतत्त्वावर या रिकाम्या खोल्या द्याव्यात, अशीही मागणी संस्थेने केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेत प्रस्ताव देण्यास सांगितले होते. मात्र, त्याबाबत त्या शाळेकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही अन्यत्र जागा मिळते काय, याचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यालाही उशिर झाल्याने मुलांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. मात्र, २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठीच केवळ शाळा बंद ठेवून नंतर पुन्हा नव्या जोमाने ही माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. आता केवळ जागेचाच प्रश्न बाकी आहे. जागा मिळाल्यावर त्याठिकाणी शाळेची इमारत बांधून देण्यासाठी काही दातेही तयार आहेत. शासनाकडून लवकरात लवकर जागेची मंजुरी मिळून या शाळेची इमारत नजीकच्या काळात नक्कीच उभी राहील व कुवारबावचे नाव ही शाळा उज्वल करील, असा विश्वासही या संचालकांनी व्यक्त केला. राज्यात भाजप - सेनेचे सरकार आहे. या सरकारमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांचे चांगले वजन आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन शाळेच्या जमिनीबाबतचा विषय लवकरात लवकर निकाली निघावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही संस्थेच्या संचालकांनी सांगितले. (समाप्त)अनुदानही मिळावे...कुवारबाव शिक्षण प्रसारक मंडळ १४ वर्षांपूर्वी स्थापन झाले. त्यानंतर दोन वर्षांनी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. तब्बल १२ वर्षे ही माध्यमिक शाळा चालली. या दरम्यानच्या काळात अनुदान देण्याबाबत शाळेची तपासणी झाली. परंतु इमारत, जागा यांसारख्या काही त्रुटी काढल्या गेल्या. या त्रुटींची पूर्तता करून देण्यास संस्थेची तयारी आहे. इमारतीसाठी सुचवलेली शासकीय जमीन मिळावी. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर अनुदानही मिळावे, अशी संस्थेची मागणी आहे.