लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून, येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया चौथ्या टप्प्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून, अटी व शर्तींच्या अधिन राहून अनलॉक प्रक्रिया होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची काेरोनाबाधित होण्याची टक्केवारी १७.८३ टक्के इतकी असून, ऑक्सिजनचे ८०० बेड सध्या भरलेले आहेत. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया चौथ्या टप्प्यात होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने कोरोना परिस्थिती पाहून त्यानुसार जिल्हा प्रशासनाला अनलाॅकचेही अधिकार दिले आहेत. त्यामुळे या चाैथ्या टप्प्यात कुठले निर्बंध उठणार आणि कुठले राहणार, हे जिल्हा प्रशासनाच्या अधिकारानुसार अवलंबून राहणार आहे.
काय सुरु राहील?
आवश्यक वस्तूंची दुकाने, जीम, सलून, कृषी सेवा केवळ दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येतील.
उपहारगृहांची पार्सल किंवा घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. आतमध्ये ग्राहकांना बसता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणे, पटांगणे, क्रीडा शनिवार, रविवारी बंद तर अन्य दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत सुरू राहतील.
शासकीय, खासगी कार्यालये २५ टक्के तर उद्योग ५० टक्के क्षमतेवर सुरू राहतील.
विवाहासाठी २५ तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा कायम राहील.
काय बंद राहील?
आवश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने, आस्थापना, सिनेमागृहे, नाट्यगृहे, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम बंद राहणार आहेत. आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर ये-जा करणे किंवा हालचालींवर पूर्णत: बंदी राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक करताना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील.
शासनाने पाच स्तरावर अनलाॅक प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या रत्नागिरीत चौथ्या स्तरावर अनलाॅक हाेणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या अनुंषगाने जी स्थिती असेल त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू करावी लागेल.
- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी
ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत तिथे पहिल्या स्तरात अनलाॅक होईल.
ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड टक्केेवारी २५ ते ४० असेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या स्तरावर निर्बध उठतील.
पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के असेल आणि ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, अशा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तराप्रमाणे अनलाॅक होईल.
ज्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले असतील तर तिथे ४ थ्या स्तर लागू होईल
२० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेड भरलेले असतील त्या जिल्ह्यात ५ व्या स्तराप्रमाणे निर्बंध रहातील.