अजूनही शेकडो नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपर्यंत सुमारे १३००पेक्षा अधिक शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अन्य नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. शुक्रवारनंतर सोमवारपर्यंत रत्नागिरी आरोग्य विभागाकडून लसीचे डोस पुरविण्यात न आल्याने परिसरातील शेकडो नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
खालगाव - जाकादेवीतील अनेक नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकही आरोग्य केंद्रात येऊन लसीबाबत चौकशी करत असतात. लसीच्या मात्रा कमी नि लोकांची गर्दी जास्त, असे चित्र जाकादेवी आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे. लस उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्यास सकाळी लवकर येऊन आरोग्य केंद्रात नंबर लावून टोकन घेण्याचे आवाहन येथील लसीकरण विभागाने लाभार्थ्यांसाठी केले आहे. सकाळी लवकर जाणे आणि लस घेणे यासाठी नागरिक लसीची प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत जाकादेवी केंद्रातर्फे एक हजार तीनशेपेक्षा जास्त लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले असल्याची माहिती या केंद्राच्या पर्यवेक्षक सुषमा आचरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोर्तंडे यांनी दिली. लाभार्थ्यांनी शिस्त व नियम पाळून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन पर्यवेक्षक सुषमा आचरेकर यांनी केले आहे.