प्रकाश वराडकर -रत्नागिरी -दूरून डोंगर साजरे अशी गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीकरांची स्थिती झाली आहे. शीळ धरणात मुबलक पाणी आहे. परंतु ते रत्नागिरीकरांच्या मडक्या-भांड्यात कधी येणार, असा टाहो रत्नागिरीकर गेल्या ७ ते ८ वर्षांपासून फोडत आहेत. याबाबत गेल्या ८ वर्षात पालिकेत आलेल्या कारभाऱ्यांनी केवळ बोलघेवडेपणाच केला, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे पालिकेच्या योजनारुपी कागदावरून वाहणारे पाणी शहरवासीयांपर्यंत फारसे झिरपलेच नाही. आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा आश्वासनांचे पाणी वाहू लागले आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणीही न पाजणाऱ्या कारभाऱ्यांना रत्नागिरीकर येत्या निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजणार काय, हाच खरा सवाल आहे. पाण्यासाठी शहरवासीयांना एकमेकांमध्ये झुंजवत ठेवणारा कारभारच गेल्या आठ वर्षात झाल्याचा जाणकारांचा आरोप आहे. त्यामुळेच शीळ धरणात पाणी असूनही ते शहरवासीयांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. रत्नागिरी शहराला दररोज सुमारे १६ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. हे पाणी शीळ धरण, पानवल धरण, एमआयडीसी व नाचणे तलाव येथून घेतले जाते. त्यातील सर्वाधिक १२ दशलक्ष घनमीटर पाणी शीळ धरणातून उचलले जाते. पानवल धरण तब्बल ४९ वर्षांपूर्वी उभारले गेले. त्या धरणावरून गुरुत्वबलाद्वारे रत्नागिरीतील नाचणे येथे जलशुध्दिकरण प्रकल्पात विनावीज पाणी आणले जाते. पानवल धरणातील गाळउपसा करण्यावर लाखो रुपये खर्च केले गेले. काढलेला गाळ काठावरच ठेवल्याने पावसाळ्यात तो पुन्हा धरणात वाहून गेला. त्यामुळे गाळउपशावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला. एवढे जुने धरण तळाशी खचले, गळती सुरू झाली तरी त्याच्या दुरुस्तीचे नाव काढले गेले नाही. मलमपट्टी केली, परंतु मूळ दुखणे तसेच राहिले. ४९ वर्षांपूर्वी या धरणावरून उभारण्यात आलेली लोखंडी जलवाहिनी व त्यावरील सिमेंटचा थर यामुळे चार दशके टिकून होती. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात या जलवाहिनीलाही जागोजागी भोके पडली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती आहे. धरणाला व जलवाहिनीला गळती लागल्याने क्षमता असूनही या धरणातून पाणी मिळू शकत नाही, अशी स्थिती आली. शीळ धरणात गेल्या सात - आठ वर्षांपासून मुबलक पाणी आहे. या धरणातील ५० टक्केच पाणी याआधी रत्नागिरी नगरपरिषद खरेदी करीत होती. मात्र, आता १०० टक्के पाणी घेण्याचा करार रत्नागिरी नगरपरिषदेने केला आहे. गेल्या काही वर्षात धरणाच्या सांडव्यांची उंचीही वाढवण्यात आली. त्यामुळे पाणी साठा वाढला. परंतु साठा वाढला तरी शीळ ते साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रापर्यंतची २० वर्षांपूर्वी टाकलेली जलवाहिनी जागोजागी फुटल्याने पाणी वाया जात आहे. प्रत्येकवेळी मलमपट्टी व त्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सततचा दुरुस्तीचा त्रास, हे दुष्टचक्र सुरूच आहे. आधीच शीळचे पाणी मोठ्या जलवाहिनीतून गळती होत जलशुध्दिकरण केंद्रात येत असतानाच पुढे जलशुध्दिकरण केंद्रातून हे पाणी शहरातील अंतर्गत जलवितरण करणाऱ्या जलवाहिन्यांमधून रडत-खडत नळजोडण्यांमध्ये पोहचत आहे. (क्रमश:)कारभाऱ्यांची नामुष्की की रत्नागिरीकरांचा पराभव ? शहर वाढते आहे, विस्तारते आहे. त्यामुळे शहर विकासाच्या दिशेने खऱ्या अर्थाने कारभाऱ्यांची पावले पुढे पडली पाहिजेत. परंतु तसे गेल्या काही वर्षांतील कारभारावरून रत्नागिरीकरांना वाटत नाही, ही कारभार करणाऱ्यांची नामुष्की आहे की, त्यांना सत्तेवर बसवणाऱ्या रत्नागिरीकरांचा पराभव आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकांच्यावेळी आश्वासने देणारे नंतर फिरकत नाहीत. शहर विकासापेक्षा ‘स्वविकासा’कडे त्यांचा कल अधिक असतो, असा आरोपही केला जात आहे.
शीळच्या पाण्याची प्रतीक्षाच
By admin | Published: May 10, 2016 10:13 PM