आनंद त्रिपाठी -- वाटूळ मुंबई - गोवा महामार्गालगत असलेली पूर्ण प्राथमिक शाळा, वाकेड नं. २ ला आयएसओ मानांकन मिळाले आहे. लांजा तालुक्यातील ही पहिलीच शाळा ठरली आहे.मुख्याध्यापक संतोष सोळंके यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी थोड्याच अवधीत शाळेचा संपूर्ण कायापालट घडवून आणला. पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत १०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, सर्व जल अभियान, परिसर विकास प्रकल्प, शेतीकाम प्रत्यक्ष अनुभव, बचत योजना, लोकसहभागातून ग्रंथालय समृद्धी, निसर्गरम्य वाचन कट्टा, एक घास चिऊसाठी, गप्पी मासे पैदास, वाळू शिल्प, निर्धूर चूल आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतले जाते. माळीण दुर्घटनाग्रस्त मदत निधी, राजापूर येथील शिवस्मारकाला खाऊच्या पैशातून मदत, राख्या तयार करणे आदी सामाजिक उपक्रमाचे भानदेखील गुरुजनांकडून राखले जात आहे.केंद्र शासनाला अपेक्षित असलेल्या ९६ बाबींची पूर्तता केल्यानंतरच अत्यंत प्रतिष्ठेचे आयएसओ मानांकन शाळांना दिले जाते. शाळेला यापूर्वी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. शालेय परिसर विकास प्रकल्पामध्ये सलग दोन वर्षे शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात लेक शिकवा अभियान ही नाटिका जागर स्पर्धेमध्ये सादर करण्यात आली होती. त्यामध्ये शाळेला प्रथम क्रमांक मिळाला. सर्वाेत्कृष्ट प्रकल्प प्रमुख म्हणून जिल्हास्तरावर शाळेतील शिक्षक प्रकाश भोवड व विशाल मोरे यांना प्रथम क्रमांक मिळाला. सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्येही शाळेला सलग २ वर्षे प्रथम क्रमांक मिळाला. तंबाखूमुक्त शाळेसाठीचा गोल्डन व सिल्व्हर पुरस्कार मुख्याध्यापक संतोष सोळंके व उपशिक्षक विजय कदम यांना मिळाला आहे.शिक्षक मंगल परूळेकर, प्रकाश भोवड, विजय कदम, विशाल मोरे या सर्वांचे सहकार्य तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या योगदानामुळे शाळेला आयएसओ नामांकन मिळाले.- संतोष सोळंके, मुख्याध्यापक
वाकेड शाळा नं. २ला आयएसओ मानांकन
By admin | Published: March 25, 2016 10:27 PM