चिपळूण : सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अस्तित्व आजही टिकून आहे. येथील गड, किल्ले, दुर्ग, दऱ्या-खोऱ्या, ऐतिहासिक स्थळे त्याची साक्ष देतात. शिवरायांची थोरवी गाणारा हा शिवकालीन इतिहास जाणण्यासाठीच चिपळूण तालुक्यातील कापरे येथील सुपुत्र, साहसी गिर्यारोहक योगेश भुर्के गेली बारा वर्षे सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करत आहेत.
आतापर्यंत योगेश भुर्के यांनी तीसहून अधिक गड - किल्ले, दुर्ग आणि व्हॅली यांच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत. अंगावर शहारे आणणारी सांधण व्हॅली, माहुली गड परिसरातील प्रसिद्ध वजीर सुळका, लिंगाणा, सह्याद्रीच्या कुशीतील कोकण कड्यावर रॅपलिंग व क्लाईंबिंगचा थरार त्यांनी अनुभवला आहे. योगेश भुर्के हे सध्या नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्याला आहेत. त्यांना बालपणापासून शिवकालीन इतिहास वाचण्याची आवड होती. बालपणी आजी-आजोबांकडून शिवरायांची महती सांगणाऱ्या अनेक गोष्टी कानी पडल्या. पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास, गड - किल्ले, दुर्ग, दऱ्या-खोऱ्यांची माहिती वाचताना त्यांच्या मनात या स्थळांविषयी विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि ताे छंदच जडला. पोलादपूर येथील शाम तांबे या मित्राकडून गिर्यारोहणाविषयाचे धडे मिळाले. त्यानंतर आपली नोकरी सांभाळून सचिन खेडकर, विनायक सावंत, सुयश नेरूळकर अशा काही मित्रांबरोबर गडकिल्ल्यांचे महत्त्व, दुर्ग संवर्धनाची गरज ओळखून व त्याविषयीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ते सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात अनेक अवघड भटकंतीच्या मोहिमा करत आहेत.
------------------------
आयुष्यभर लक्षात राहणारे तीन ट्रेक
१) कोकणकडा रॅपलिंग १८०० फूट
२) वजीर सुळका २८० फूट क्लाईंबिंग ९० डिग्री
३) लिंगाणा ३००० फूट सर
---------------------------
कडेकपारीतून हिंडला राजा माझा
आपल्या मुलांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढून आपले गड-किल्ले दाखवा. त्यांना आपला इतिहास प्रत्यक्षात बघू द्या. मोबाईलच्या बाहेरही एक जग आहे, त्याच नाव आहे ‘सह्याद्री’ हे दाखवून द्या. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुस्तकांपुरता मर्यादित नाही हे त्यांनासुध्दा समजू द्या!
- योगेश भुर्के, गिर्यारोहक, चिपळूण
---------------
आजपर्यंत भीमाशंकर ट्रेक (खांडस मार्गे), पदर गड, एएमके (अलंग-मदन-कुलंग), सांधण व्हॅली, हरिहर किल्ला, कलावंतीण दुर्ग, प्रबळ गड, चंदेरी किल्ला, ढाक बहिरी, लिंगाणा किल्ला ३००० फूट (जो ट्रेकर मंडळींना नेहमीच खुणावत असतो), भैरवगड, सिद्धगड, गोरखगड, कोथळी गड, कळसुबाई (महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर) आदी ठिकाणच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत.
------------------------------------
वजीर सुळका चढल्यानंतर याेगेश भुर्के यांनी आनंदोत्सव साजरा केला.
150721\img-20210715-wa0013.jpg
सह्याद्री'च्या कडे-कपारीत चिपळूणच्या सुपुत्राची भटकंती