संजय सुर्वे/शिरगाव : आपल्या घरात वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादातून वयाच्या अठराव्या वर्षी घराबाहेर पडलेला छत्तीसगडचा तरुण रेल्वेतून थेट मुंबईला पाेहाेचला. आपला नाव, पत्ता सांगू न शकणाऱ्या अनोळखी व्यक्तीला कोणीच न विचारल्याने पुन्हा तो मडगाव रेल्वेने चिपळुणात आला. काम शोधता-शाेधता जगण्यासाठी धडपड सुरू असतानाच मंदबुद्धी असल्याने चोर म्हणून मार खाण्याची वेळही त्याच्यावर आली. मात्र, सहा वर्षांनी तो आपल्या कुटुंबात परतला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
छत्तीसगड येथील वीट व्यावसायिक कुटुंबातील भरतकुमार चंद्राकार हा तरुण आपल्या परिवारात किरकोळ कारणावरून भांडून नातेवाइकांकडे रुसून जात असे. मात्र, एक दिवस वडिलांसाेबत वाद झाला आणि ताे घरातून बाहेर पडला. त्यानंतर ताे थेट मुंबईत आला. स्वतःविषयी कोणतीच माहिती न देणारा भरत घाबरून पुन्हा गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसला. कुठे जायचे हे न समजल्याने ताे चिपळुणात उतरला आणि रस्त्याने चालत खेर्डीत आला. काम केलं तर अन्न मिळेल इतकं समजत होतं तसे तो कामही करू लागला; पण फक्त जेवण व हुकूमत याला कंटाळून तो पळून पोफळी येथे पोहाेचला. चोर समजून त्याने अनेकांचा मारही खाल्ला.
सह्याद्री कासारखडक येथील बबन शेळके या जाणकार धनगरांनी त्याला काम कर आणि कुटुंबासारखा राहण्याचा सल्ला दिला. डोंगराळ भागात तो सुरक्षित आणि समाधानी राहिल्यावर सह्याद्री संवर्धन आणि संशोधन संस्थेच्या राणी प्रभूलकर, सदफ कडवेकर, संजय सुर्वे, सूर्यकांत शिंदे यांच्यासह अनेकांचा ताे मित्र बनला. २५ वर्षे वयाच्या तरुणाला आयुष्यभर याच जागेवर ठेवणं संस्थाध्यक्ष राणी प्रभूलकर यांना पटत नव्हते आणि तो फक्त छत्तीसगड इतकंच बोलत होता. मग संस्थेने त्याच्या परिवाराचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. त्याला घेऊन त्याच्या जिल्ह्यात जाण्यासाठी खर्च तरतूद नियोजन झाले. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधल्यानंतर त्याच्या घरची पाच जवळची भावंडे लगेच निघाली आणि शिरगावला पोहाेचली. आपली घरची माणसे मिळाल्याच्या आनंदात भरत नाचू लागला. अडखळत काही सांगणारा जवळपास समजेल असे बोलू लागला.
सह्याद्री खोऱ्यातील तो धनगरपाडा बघून भरत आपल्या गावी परत जाणार आहे. संस्थेच्या कार्यालयात नवीन कपडे घालून आजवर भाऊ म्हणून राखी, दिवाळी करणारी राणी प्रभूलकर वाढदिवसाचा केक घेऊन त्याचा आनंद द्विगुणित करण्यास सज्ज होती. कोकणातील आठवणी आणि सर्वांनी साजरा केलेला वाढदिवसातील आनंद घेऊन भरत आपल्या गावी जाणार आहे.
----------------------
...अन् डाेळे आले भरून
चिपळूणच्या पूरस्थितीत मदतकार्यात या तरुणाला संस्थेच्या कामाला जोडण्यात आले. एक दिवशी सचिव सदफ कडवेकर यांनी त्याला शेजारी बसवून लॅपटॉपवर त्याच्या भागाची माहिती गुगलद्वारे दाखविली. जिल्हा, तालुका आणि थेट गाव दिसल्यावर त्याला काही आठवले. जवळच्या व्यक्तीचे नंबर शोधताना एका पोलिसाकडून थेट घरात संपर्क झाला. सहा वर्षांनी व्हिडिओ कॉलवर भरत आणि कुटुंबाची पहिली भेट झाली. मुलाला पाहताच पालकांच्या डोळ्यांत पाणी आले.