राजापूर : शहरातील नागरिकांसाठी प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेची तयारी नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेसाठी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी मोबाइल व्हॅन मोफत उपलब्ध करून दिली आहे. या मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून प्रभागात लसीकरण केले जाणार आहे़ या वाहनाची चावी सोमवारी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे देण्यात आली.
राजापूर शहरात १०० टक्के लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी २२ मे रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्रही दिले होते. आता नगर परिषदेने शहरातील नागरिकांसाठी आठ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. नगर परिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही लसीकरण मोहीम प्रभाग निहाय राबविली जाणार आहे.
या मोफत मोबाइल व्हॅनची चावी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी मुख्याधिकारी ढेकळे यांच्याकडे सुपुर्द केली. याप्रसंगी माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुभाष बाकाळकर, भाजप नगरसेवक गोविंद चव्हाण, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, आरोग्य विभागाच्या अनुष्का जुवेकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.