राजापूर : आरोग्य विभागातर्फे धारतळे येथे नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरला राजापूर तालुका मराठा समाजसेवा संघातर्फे वॉशिंग मशीन भेट देण्यात आले.
आरोग्य विभागाकडून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत ३५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विविध प्रकारच्या आरोग्यविषयक वस्तूंचा पुरवठा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. राजापूर तालुका मराठा समाजसेवा संघालाही याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत रुग्णांच्या सुविधेसाठी संघातर्फे कोविड सेंटरसाठी सुमारे १५ हजार रूपये किमतीची वॉशिंग मशीन भेट देण्यात आली. यावेळी मराठा समाजसेवा संघाचे अॅड. राहुल राणे, संजय ओगले, विनायक सावंत, प्रकाश पवार, नरेंद्र मोहिते, अॅड. सुशांत पवार, अॅड. गुरुदत्त खानविलकर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.