चिपळूण : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बागा आणि अन्य कामांसाठी वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती प्रॉम्प्ट एन. व्हाय. रो.चे पी. डी. पोकळी यांनी पत्रकारांना दिली.चिपळूण शहरातील सांडपाणी सध्या विविध मार्गाने वाशिष्ठी नदीत सोडले जाते. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करुन ते बागेसाठी वा अन्य कामासाठी वापरात आणणे शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांनी आपले सांडपाणी व मैला, कचरा गटारात नद्यांमध्ये न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश दिले आहेत. पृथ्वीवरील पाणीसाठ्यापैकी ०.७ टक्के पाणी मानवी जीवनात पिण्यायोग्य आहे. चिपळूण शहरामध्ये सध्याचे पाण्याचे अधिग्रहण आठ एमएलडी आहे. शहराचा पाच वर्षांचा होणारा विस्तार लक्षात घेऊन हे प्रमाण १२ एमएलडीपर्यंत जाऊ शकते, असेही पोकळी यांनी सांगितले.सांडपाण्यावर रासायनिक प्रक्रिया करुन ते अन्य कारणासाठी वापरात आणले जाणे काळाची गरज आहे. यासाठी केंद्र शासन आर्थिक मदत देण्यास तयार आहे. प्रॉम्प्ट एन व्हाय रो ही संस्था कुबेर कन्स्ट्रक्शन, पुणेशी संलग्न असून, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावावर नगर परिषद प्रशासनाने योग्य विचार केल्यास भविष्यात हा प्रश्न भडसावणार नाही, असा विश्वास पोकळी यांनी व्यक्त केला आहे. चिपळूणचा सांडपाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच पर्याय पुढे आला आहे. (वार्ताहर)
चिपळुणातील सांडपाणी प्रक्रियेद्वारे शुद्ध होऊ शकते : पी. डी. पोकळी
By admin | Published: February 12, 2015 11:50 PM