चिपळूण : तालुक्यातील धामणवणेसह टेरव गावात निर्माण झालेल्या टंचाईग्रस्तांना येत्या काही दिवसांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आ. शेखर निकम यांनी महामार्गाच्या व्यवस्थापनास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीचे निवेदन दिले आहे.
वाढत्या उष्म्यामुळे तालुक्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे मार्च महिना उजाडताच टंचाईग्रस्तांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होऊ लागली आहे. आतापर्यंत तीन गावांचे प्रशासनाकडे अर्ज पाप्त झाले आहेत. असे असताना प्रशासनाच्या टंचाई आराखड्यात समाविष्ट नसलेल्या धामणवणे गावातील बौद्धवाडी, दत्तवाडी, शिगवणवाडी, दोणेवाडी, हळंदबावाडी, पिटलेवाडी आदी सहा वाड्यांमध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा यासाठी ग्रामस्थांसह सपरंच सुनील सावंत यांनी याप्रश्नी आ. शेखर निकम यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार या टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. येत्या काही दिवसांत या गावांना टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जाणार आहे. यावेळी सुभाष जाधव, राम रेडीज, विश्वास वाजे, संतोष वरेकर उपस्थित होते.