राजापूर : तालुक्यातील पाच गावांमध्ये सुमारे १ कोटी ५१ लाख एवढ्या खर्चाची ८५ कामे जलयुक्त शिवार योजनेतून झाली असल्याचे कृ षी अधिकारी सांगत असतानाच योजनेची कामे झालेल्या गावांमधील पाणीटंचाई कायम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. संतप्त सदस्यांनी याबाबत विविध सवाल उपस्थित करत कृ षी विभागावर प्रश्नांची सरबत्ती केली. सभापती सोनम बावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सर्व पंचायत समिती सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे यावेळी अनेक खात्यांचे प्रमुख अनुपस्थित होते तर काही अधिकारी विलंबाने सभागृहात दाखल झाले. याबाबत उपस्थित सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यापुढे मासिक बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या व विलंबाने सभागृहात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपसभापती उमेश पराडकर यांनी दिला. या मासिक सभेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. वाढता दुष्काळ लक्षात घेता यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात पाच ते दहा हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. रस्त्यालगतच्या झाडांची जोपासणी करण्याची जबाबदारी त्या - त्या ग्रामपंचायतींना देण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी दिली. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कामाच्या आराखड्यावरुन अधिकारी वर्गात एकवाक्यता नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनाला आले. शासनाच्या शेष फंडातून ११ लाखांची तरतूद होऊनदेखील अद्याप पाणी व्यवस्थेशी संबंधित कामे मार्गी लागलेली नसल्याची माहिती सदस्यांनी यावेळी दिली. तालुक्यात अनेक नळपाणी योजना अद्याप सुरुच झाल्या नसल्याची माहिती सदस्यांनी देत याबाबत संताप व्यक्त केला. अशा सर्व नळपाणी योजनांची तत्काळ चौकशी करा व दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दीपक नागले व शिवाजी रबसे यांनी केली. दिनांक ३० एप्रिलला सर्व शिक्षकांच्या कामगिऱ्या रद्द केल्या जाणार आहेत व जर जास्त पटसंख्या व कमी शिक्षक एखाद्या शाळेत असेल तरच कामगिरी काढली जाईल, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. तर २० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या तालुक्यातील १७६ शाळांबाबतची माहिती शासनाला देण्यात आली असल्याचेही सांगितले. पण अद्याप कारवाई झालेली नाही, अशी माहितीही दिली. विद्यार्थी पटसंख्येवरुन वाद निर्माण करणाऱ्या जैतापूर - आगरवाडी व वाडाभराडे येथील मुख्याध्यापकांवर कारवाई करा, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले. कशेळी शाळा नंबर ५ला इयत्ता ७ वीचा वर्ग जोडण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचीही माहिती देण्यात आली. तालुक्यातील काही अंगणवाड्यांना अद्यापही विद्युत पुरवठा न दिल्याने या अंगणवाड्या बंद असल्याची माहिती मासिक सभेत पुढे आली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील पाच गावे निवडण्यात आली असून, त्यामधील ८५ कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये खरवते ७, झर्ये ३३, ताम्हाणे ६३, मोरोशी २६ व कारवली १६ अशी कामे मार्गी लागली असून, त्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती कृ षी अधिकारी चंद्रामणी मेश्राम यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात तालुक्यात करक, तळवडे व जवळेथर या तीन गावांची निवड झाली आहे. मात्र, त्यातील तळवडे व करक या गावांमध्ये धरण प्रकल्प असल्याने ती गावे जलयुक्त शिवार योजनेत कशी? असा सवाल उपस्थित सदस्यांनी केला. पण त्यावर समर्पक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. (प्रतिनिधी) आधी ‘नळपाणी’ : आता ‘जलयुक्त शिवार’ नळपाणी योजना राबवूनही तालुक्यात अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. आता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे झालेल्या गावातही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याबाबत खमंग चर्चा सुरु आहे. अधिकारी विलंबाने.. पंचायत समितीचे काही अधिकारी उशिराने सभेसाठी दाखल झाले. अनेकवेळा कारवाईची मागणी होऊनही अधिकाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही.
‘जलशिवारात’ पाणीटंचाई कायम
By admin | Published: April 20, 2016 10:30 PM