दापाेली : तालुक्यातील बांधतिवरे नदीवरील वाढीव हर्णै प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलशेजारीच बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याने हर्णै सुकाणू समितीने हे अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. हे उत्खननाचे काम थांबले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हर्णै प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला हानी पोहोचवाल तर याद राखा, असा इशाराच सुकाणू समितीचे अध्यक्ष सोमनाथ पावसे यांनी दिला आहे.
बांधतिवरे नदीवर हर्णै, पाजपंढरी, अडखळ आणि शिवाजीनगर या चार संयुक्त ग्रामपंचायतींतर्फे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. ज्याठिकाणी या योजनेचा मुख्य जॅकवेल आहे, त्याच्याशेजारी गिम्हवणे ग्रामपंचायतीने अवैध उत्खनन सुरू केल्याचा आरोप सुकाणू समितीने केला आहे. हे काम तत्काळ थांबवावे, अशी मागणी दापोली तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे निर्मल ग्रुप ग्रामपंचायत, गिम्हवणे वणंद यांनी सुरू केलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुकाणू समितीने हरकत घेतली आहे.
वाढीव हर्णै प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना २००७पासून सुरू आहे. चार गावांची पाणीटंचाई या नळपाणी पुरवठा योजनेमुळे दूर झाली आहे. परंतु, या नळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलशेजारी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असल्यामुळे या नळपाणी पुरवठा योजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाईसारख्या समस्येला या गावांना सामोरे जावे लागणार आहे, पाणीसाठा कमी झाल्यास पाणीटंचाईसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा विचार करून सुकाणू समितीने जॅकवेलशेजारी उत्खनन करण्यास आक्षेप घेतला आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष सोमनाथ पावशे, उपाध्यक्ष जहूर कोंडविलकर, भास्कर दोरकुळकर, राजेंद्र चौगुले, महेश मेहंदळे यांनी हे काम थांबविण्याची मागणी केली आहे.
.........................
गिम्हवणे ग्रामपंचायतीने सुरु केलेले अवैध उत्खनन तत्काळ थांबवावे अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने जावे लागेल. तसेच हे उत्खनन थांबले नाही तर आम्ही आमचे हक्क व मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू वेळप्रसंगी चारही गावातील लोक तहसील कार्यालयावर धडक देऊ.
- सोमनाथ पावसे, अध्यक्ष, सुकाणू समिती
...............................
चार गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला धक्का लावून आमच्या हक्काचे पाणी कोणी हिरावून घेऊ पाहत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. गिम्हवणे ग्रामपंचायतीने अवैध उत्खनन थांबवावे. आमच्या हक्काच्या पाण्यावर कोणी गदा आणू पाहत असेल तर चारही गावांमधील ग्रामस्थ स्वस्थ बसणार नाहीत.
- राजेंद्र चौगुले