चिपळूण : पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.यापूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळुणात आता केवळ मोजकीच तळी शिल्लक राहिली आहेत. शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले रामतीर्थ, विरेश्वर व नारायण तलाव एवढे मोजकेच तलाव आता अस्तित्वात आहेत.
यामधील विरेश्वर तलावाची पाण्याची पातळी खालावली असून, तळाचा भाग दिसू लागला आहे. नारायण तलावाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी त्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत तलावातील गाळ काढण्यात आल्याने येथील पाण्याची पातळी टिकून आहे.रामतीर्थ तलावाचाही गेल्यावर्षी गाळ काढण्यात आल्याने येथेही पाणीपातळीत फारशी घट झालेली नाही. त्यामुळे शहरातील शंकरवाडी, पवारआळी, मार्कंडी परिसरातील जनावरांना या तलावातील पाण्याचा आधार मिळत आहे. मात्र, मे महिन्याच्या उत्तरार्धात येथील पाण्याच्या पातळीतही घट होण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतानाच शहरातील तळ्यांमधील पाण्याच्या पातळीत घट होऊ लागल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणारे पशुपक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.