नियोजनबद्ध लसीकरण
दापोली : तालुक्यातील उन्हवरे ग्रामपंचायतीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम सुरु आहे. नियोजनबद्ध काम करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. फणसू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उन्हवरे आरोग्य उपकेंद्रामध्ये लसीकरण करण्यात येत आहे.
बचत गटासाठी निधी मंजूर
रत्नागिरी : उमेद अभियानातील बचत गटांमार्फत अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री व सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून जिल्ह्यातील १३४ महिला लाभार्थ्यांना १ कोटी ३७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे बचत गटातर्फे शासनाच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
नातेवाईकांना बंदी
चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांना बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णालय आवारात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पर्यायी व्यवस्था करण्यापूर्वीच हा निर्णय घेतल्याने नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
रत्नागिरी : रिलायन्स फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गरजू लोकांसाठी करण्यात आले. तेल पिशवी, पीठ, हळद, डाळ, साखर, मीठ आदी जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करुन ते देण्यात येत आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सतर्फे आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबीयांना किटचे वाटप केले. फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
पालक चिंतेत
रत्नागिरी : सीबीएसई व आयसीएसईच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सोमवार, दिनांक ३१ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर परीक्षेच्या बाबतीत राज्य शासनाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अद्याप अभ्यासात मग्न असले तरी पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बियाणे वाटप
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे दत्तक व शेजारील खेड्यांमध्ये भात, नाचणी व भाजीपाला पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत, आदी उपस्थित होते.
लसीकरणाची मागणी
दापोली : जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांचे लसीकरण आगारातच करण्याची मागणी केली आहे. सध्या आगारात ३९३ कर्मचारी कार्यरत असून, १९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित १९७ जणांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे आगारातच लसीकरण व्हावे, अशी मागणी केली आहे.
डीपी धोकादायक
चिपळूण : शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या विरेश्वर तलावाशेजारी असलेला महावितरणचा डीपी गेले काही दिवस उघडा आहे. वादळी वारे व पाऊस अधुनमधून पडत असल्याने हा डीपी धोकादायक झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात कुठलाही अपघात होऊ नये, यासाठी डीपी बदलण्याची मागणी होत आहे.
नवीन अभ्यासक्रम
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठातील रत्नागिरी उपकेंद्रात शैक्षणिक वर्ष २०२१ - २२पासून औद्योगिक सुरक्षा व व्यवस्थापन पदविका व मत्स्यपालन प्रमाणपत्र हे अभ्यासक्रम अनुक्रमे वर्ष व सहा महिने या कालावधीत सुरु होणार आहे. विज्ञान शाखेचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांनाच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.