- मध्यरात्री उडाली मोठी धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाने रविवारी झोडपून काढले. वादळी पावसामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती. पावसाचे पाणी साचून जिल्हा रुग्णालयाची अवस्था तळ्यासारखी झाली होती. याचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. या गळतीमुळे इमारतीच्या कामाबाबत साशंकता निर्माण होत आहे.
जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढलेले असतानाच जिल्हा रुग्णालयाची इमारत तर तलाव बनल्याचे चित्र आहे. निकृष्ट बांधकामामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जिन्यासह मोकळ्या भागात जमा झाले होते. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांचे नातेवाईकही या ठिकाणी आहेत. रात्री इमारतीत पाणी साचल्याने नातेवाईकांना याचा मोठा त्रास झाला.
पावसाचे पाणी रुग्णालयात जमा होताच सगळ्यांची धावपळ उडाली. पाण्यामुळे नातेवाईकांना रात्र पाण्यातच काढावी लागली. सोमवारी सकाळी हे पाणी काढण्यात आले.