गणपतीपुळे : नेवरे गावची पुढील १५ वर्षांची गरज लक्षात घेऊन पाण्याचा अहवाल सादर करावा, त्यानंतरच या योजनेचा विचार करण्यात येईल, असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी नेवरे सरपंच व ग्रामस्थ यांना विचारात न घेता ही योजना सादर केल्याने आमदार उदय सामंत व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आमदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गणपतीपुळे परिसर पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. पर्यटक निवास, गणपतीपुळेच्या सभागृहात ७८ कोटींचा गणपतीपुळे पर्यटन परिसर विकास आराखड्याची यादी संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार उदय सामंत यांना दिली. सदरील गणपतीपुळे पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आला. या विकास आराखड्यात रस्ते विकासकामे योग्य असल्याचे सांगितले. यानंतर गणपतीपुळे पाणी प्रश्नावर चर्चा करताना या विकास आराखड्यात नेवरे येथील पाणी पुरवठा योजना विचारात घेण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास, गणपतीपुळेसाठी मालगुंड येथील शुभ्र कमल तलावाशेजारील पर्यटन विकास महामंडळाच्या जागेतील विहिरीतून पाणीपुरवठा सुरु असून, सदर महामंडळाने मालगुंड ग्रामपंचायतीला ६० लाख देण्याचे मान्य केले. त्यातील केवळ २० लाख मिळाले आहेत. ४० लाख देण्याचे आश्वासित पत्र द्यावे नाही, तर पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे माजी सभापती प्रकाश साळवी व उपसरपंच प्रसाद पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार उदय सामंत यांना बाराव्या वित्त आयोगातून झालेली काही कामे अपूर्ण असून, सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी, बंद पडलेले हायमॅक्स, मोडकळीस आलेले २६ दुकानगाळे या सर्व बाबी ग्रामपंचायतीने दुरुस्त कराव्यात, विविध निधी वापरुन हायमॅक्स चालू करावेत व दुकान गाळे वितरीत करावेत, असे सांगितले. तसेच शौचालय सांडपाणीसाठी शुद्धीकरण प्रकल्प उभारावा, असे सांगण्यात आले. या विकास आराखड्यासंदर्भात कामांची तपशिलवार चर्चा करण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये फक्त गणपतीपुळे ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. या विकास आराखडा बैठकीला पंचायत समिती सभापती बाबू म्हाप, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, प्रकाश साळवी, पर्यटन निवास व्यवस्थापक सुधाकर आवटे, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद केळकर, सुबोध साळवी, बाबाराम कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुजारी, जिंदलचे राजीव लिमये, देवस्थानचे डॉ. विवेक भिडे, उमेश भणसारी, अशोक काळोखे, गजानन पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) कामे डावलली : ग्रामस्थांचा आरोप गणपतीपुळे येथील पथदीप यंत्रणा मोडकळीस आली आहे. तसेच ड्रेनेज लाईन, परिसर स्वच्छता, बिच सुरक्षा आदी अती महत्त्वाची कामे डावलून गणपतीपुळेशेजारील परिसराचा ७८ कोटीचा विकास आराखडा असल्याचे गणपतीपुळे परिसर पर्यटन विकास आराखड्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थ संतप्त नेवरेवासियांना डावलून पाणी योजना शासनाकडे सादर करण्यात आल्याच्या मुद्दयावरून नेवरे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी आपल्या संतप्त भावनाही व्यक्त केल्या.
ग्रामस्थांना डावलून पाण्याचा अहवाल
By admin | Published: April 03, 2016 10:32 PM