चिपळूण : वाशिष्ठीला मिळणारे कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी राज्य शासनाने एका एजन्सीची नेमणूकही केली आहे. १९ कोटी रुपये खर्चातून ही एजन्सी याबाबत सर्वेक्षण करीत आहे. कोळकेवाडी धरणाच्या उत्तरेला म्हणजेच मुंबईच्या दिशेने हे अवजल कसे नेता येईल, त्यावर अहवाल येणार आहे; परंतु हे पाणी नेताना प्रथम या पाण्यावर स्थानिकांचाच हक्क राहील, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळुणात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चिपळूणच्या पुराला अतिवृष्टी हे महत्त्वाचे कारण आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक संकट कुठे व केव्हा येईल, हे सांगता येत नाही. कोयनेच्या अवजलामुळे येथील पुरात वाढ झाली असाही एक सूर आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन करावे लागेल. यासंदर्भात जलसंपदा खात्याने सादरीकरण केले आहे. कोयना अवजलाबाबत अनेक समित्यांनी अहवाल दिले. आता राज्य शासन एजन्सीच्या माध्यमातून वाशिष्ठीचे खोरे व उत्तरेच्या दिशेने हे पाणी कसे नेता येईल, याचे सर्वेक्षण करीत आहे. एका एजन्सीला हे काम देण्यात आले असून, त्याचा लवकरच अहवाल येईल, असेही पाटील म्हणाले.
पूररेषा कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ काढून घेणे व जास्तीत जास्त काम करून घेणे, असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच चिपळूण आणि महाड येथील पूरप्रश्न निकाली काढण्यासाठी जलसंपदाने लक्ष केंद्रित केले आहे. १७ कोटींतून महाड आणि चिपळूणमध्ये चौदा पोकलेन व तीस टिप्पर घेण्यात आले आहेत. त्यामुळे महाडमध्येही काम सुरू होत आहे. पावसाळ्यापर्यंत हे काम सुरू राहणार आहे, असे सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम उपस्थित होते.
विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न
साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळातही अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.