लांजा : तालुक्यातील रिंगणे गावातील कोंडगाव व हांदेवाडी या भागातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला असून, कार्यान्वित नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लॉकडाऊनचे अनेक निर्बंध असतानाही महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
रिंगणे गावातील कोंडगाव व हांदेवाडी भागामध्ये दरवर्षी एप्रिल - मे महिन्यांमध्ये येथील विहिरी तळ गाठतात. त्यामुळे येथे दरवर्षी या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होते. सद्य:स्थितीत कोंडगाव व हांदेवाडी येथील विहिरींनी दरवर्षीप्रमाणे तळ गाठला आहे. पाणी उपलब्ध नसल्याने निर्बंध डावलून महिलांना पाण्यासाठी पायी दूरवरून पाणी आणावे लागत आहे. कोरोनाचे संकट व पाणीटंचाई अशा दुहेरी संकटांचा सामना सध्या रिंगणे कोंडगाव व हांदेवाडीतील ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, रिंगणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील नळपाणी योजना या दोन्ही ठिकाणी कार्यान्वित आहेत. परंतु, तेथील विहिरींनी तळ गाठल्याने दोन्ही नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत.