रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, आठवडाभराच्या कालावधीत टंचाईग्रस्तांमध्ये ३ गावातील ८ वाड्यांची भर पडली आहे. आतापर्यंत ९ गावातील १४ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. वाढत्या उष्म्याने पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून कित्येक मैल पायपीट करावी लागत असल्याचे ग्रामीण भागामध्ये चित्र पाहावयास मिळत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यात वळण बंधारे, वनराई बंधारे आणि कच्चे बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लोकसहभागातून सुमारे ५ हजार बंधारे जिल्ह्यात उभारण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून यंदा पाणीटंचाईचे प्रमाण गतवर्षीच्या जवळपास आहे. अन्यथा जिल्ह्यात फेबु्रवारी महिन्यातच पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता होती. मात्र, बंधाऱ्यांमुळे लाखो लीटर्स पाणी अडविण्यात आल्याने तसेच पाणी जमिनीमध्ये जिरवले गेल्याने आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याचे निदर्शनास आले होते. यावर्षीच्या टंचाईला लांजा तालुक्यातील पालू गावातील चिंचुर्टी धावडेवाडीतून सुरुवात झाली. याच वाडीमध्ये पहिला टँकर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये धावला होता. मागील आठवड्यामध्ये ६ गावातील ६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई उद्भवली होती. आजच्या पाणीटंचाईची स्थिती पाहता गतवर्षी १० गावातील २० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. चालू स्थितीत जिल्ह्यात सध्या ९ गावातील १४ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजची पाणीटंचाई पाहता ती कमी आहे. गतवर्षीच्या आजच्या दिवसाची पाणीटंचाई पाहता आजची पाणीटंचाई एका गावाने, ६ वाड्यांनी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे कमी पाऊस पडूनही पाणीटंचाईचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून जलशिवार योजनाही राबविण्यात येत आहे.शासकीय आकडेवारीनुसार ही पाणीटंचाई कमी असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागामध्ये अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. केवळ टंचाई आराखड्यामध्ये नांव नसल्याने पाणीटंचाई असूनही त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याची ओरड सुरु आहे. याबाबत प्रशासनाकडेही लोकप्रतिनिधीनी गाऱ्हाणे मांडले आहे. जी गांवे टंचाई आराखड्यामध्ये नाहीत. मात्र, ज्या गावांमध्ये आता पाणीटंचाई उद्भवत आहे, अशी गावे आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत अशा प्रकारे मागणी करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. या टंचाईग्रस्तांना शासनाकडून ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी टंचाईग्रस्तांकडून होत आहे. (शहर वार्ताहर)
पाणीटंचाईचे चटके तीव्र
By admin | Published: April 01, 2016 10:45 PM