चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तालुक्यातील पाणीटंचाई कमी झाली आहे. तालुक्यात केवळ तिवरे परिसरातील एकमेव रिक्टोली गावात टँकर सुरू असून, दोन दिवसांत हाही टँकर बंद केला जाणार आहे. यावर्षी तालुक्यातील १७ गावांतील २८ वाड्यांना टंचाई कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
तालुक्यातील सर्वाधिक टंचाईची झळ दसपटी विभागात जाणवली. तिवरे धरणफुटीमुळे नदीत पाणी नसल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. टँकर उपलब्ध करताना प्रशासनालाही तारेवरची करसत करावी लागत होती. आवश्यक टँकर अधिग्रहण न झाल्याने टंचाईग्रस्त वाड्यांना एकाच टँकरने टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा केला जात होता. मुळात तालुक्यात कोट्यवधीच्या पाणी योजना राबविल्या तरी पाणीटंचाई संपलेली नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून नव्या पाणी योजनांचा मंजुरी मिळालेली नाही. केवळ तीन-चार गावांतच मोठ्या योजना मंजूर झाल्या. अनेक गावांत १५ वर्षांपूर्वीच्या योजना असल्याने त्यांची वारंवार दुरूस्ती करावी लागत आहे. परिणामी पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे.
तालुक्यातील तिवडी, रिक्टोली, कळकवणे, ओवळी, कादवड, गाणे, आकले, आदींसह कोसबी, कळबंट, नांदगाव खुर्द, नारखेरकी, येगांव आदी १७ गावांतील २८ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला. प्रशासनाकडे पाणीपुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाही. उपलब्ध असलेल्या एकाच टँकरच्या माध्यमातून २४ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. एकाच टँकरवर पाणीपुरवठ्याचा भार राहिल्याने महिलांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती.