चिपळूण : कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने चिपळूण तालुक्यातील आठ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी या गावांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडे शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने त्यांतील एकाही गावाला अद्याप पाणीपुरवठा झालेला नाही.
तालुक्यात कादवड, नारदखेरकी, कोसबी, अडरे, कामथे खुर्द, नांदगाव या सहा गावांतील काही वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज अंतिम मंजुरीसाठी तहसील व प्रांत कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. शहरालगतच्या धामणवणे व टेरव गावांतील वाड्यांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्याने धामणवणेचे सरपंच सुनील सावंत यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे धाव घेतली होती.
टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज आले असले तरी शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील तहसील कार्यालयाकडून खासगी टँकर अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे.
प्रशासनाने गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा ठेका घेतलेल्या मनीषा कन्स्ट्रन्शन कंपनीला, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चेतक व ईगल कंपनीला तसेच गाणे-खडपोली येथील साफयीस्ट कंपनीकडे पत्रव्यवहार करून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र या तिन्ही खासगी कंपन्यांकडून प्रशासनाच्या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वारे नामक व्यक्तीने आपल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली असून, त्या टँकरचे अधिग्रहण करून लवकरच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.