गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतून साेडण्यात आलेल्या प्रदूषित पाण्यामुळे अंजनवेल परिसरातील पाण्याचे स्राेत दूषित झाले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुहागर/असगोली : तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक पाण्याचे झरे, विहिरी क्षारयुक्त आणि दूषित झाल्या आहेत. यामुळे पिण्याचे पाणी खारट आणि मचूळ झाले असून, हे पाणी पिण्यास धोक्याचे बनले आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यापूर्वीही १९९९ मध्ये येथील अशाच प्रकारे पाणी दूषित झाले होते. त्यानंतर पुन्हा ही समस्या उभी राहिली आहे.
कंपनी आवारातील पाईपलाईन फुटल्यामुळे, त्याचप्रमाणे कुलिंग टॉवरमध्ये शितलीकरणासाठी वापरण्यात येणारे समुद्राचे क्षारयुक्त पाणी अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील डोंगर उतारावर असलेल्या नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी यामध्ये झिरपल्यामुळे गेल्या दोन
महिन्यांपासून हे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. या पाण्याची चव खारट आणि मचूळ अशा स्वरुपाची झाली आहे. हे पाणी पिण्यास खूपच त्रासदायक होत आहे. नैसर्गिकरीत्या पाण्यातील क्षार अथवा मचूळपणा निघून जाईल याबाबत गेले पन्नास दिवस वाट पाहिली; परंतु अद्याप हे नैसर्गिक जलस्रोत पूर्ववत झालेले नाहीत. हे पाणी प्यायल्याने आता साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत तातडीने पाणी प्रदूषणाबाबतची योग्य ती अधिकृत चाचणी करून या अहवालाची प्रत आम्हाला पाठवावी. तसेच तातडीने उपाययोजना करून कंपनी अंतर्गत नादुरुस्त, फुटक्या जलवाहिन्या, कुलिंग टॉवरचे शितलीकरणाचे क्षारयुक्त पाण्याचे वाहते विस्कळीत प्रवाह याचा तातडीने शोध घेऊन ते दुरुस्त करावेत, असे पत्रही हे रत्नागिरी गॅस अँड पॉवर लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे.
कंपनीमधून येणारे क्षारयुक्त प्रदूषित पाणी डोंगर उतारावरून विहिरी झरे यांच्यामध्ये मिसळत आहे ते तातडीने बंद करावे. याची दुरुस्ती न केल्यास क्षारयुक्त प्रदूषित पाणी येणे बंद होणे शक्य नाही. या प्रदूषणामुळे प्रभावित झालेल्या सर्व घरांना कंपनीकडून लवकरात लवकर शुद्ध गोड्या पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी रत्नागिरी गॅस अँड पॉवर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे.