रत्नागिरी : मान्सूनचे आगमन लांबत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाण्याचा साठ्यांवर हाेत आहे. पावसाअभावी पाणीसाठा कमी हाेत चालला आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा घटला आहे. सध्या पाणी साठ्याच्या सरासरी २३ टक्के साठा धरण क्षेत्रात शिल्लक आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाच्या आगमनावर परिणाम झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २१ जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत २० दिवसांत जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातील धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.उष्म्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे साठाही कमी होत आहे. कोयनेसारख्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पात्र कोरडे झाले आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये दिसत आहे. मध्यम प्रकल्पात नातूवाडीमध्ये ६.२३६ दशलक्ष घनमीटर, गडनदीमध्ये ५५.७०५ दशलक्ष घनमीटर, अर्जुना प्रकल्पात ५६.६७४ दशलक्ष घनमीटर, मुचकुुंदीमध्ये १४.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. नातूवाडीत प्रकल्पात एकूण साठ्याच्या २२.९० टक्केच पाणी उपलब्ध आहे.प्रकल्पाच्या पाण्यावर नळपाणी योजनांचे स्रोत अवलंबून असतात. धरणातील पाणी कमी होऊ लागले की ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेताे. अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन अजून लांबल्यास पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
दहा टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेली दहा धरणे आहेत. त्याचबराेबर धरणातील शून्य पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चिंचाळी, सुकोंडी, टांगर, तिवरे, तेलेवाडी, केळंबा, हर्देखळे, पन्हाळे, कोंडगे, कशेळी, परुळे, गोपाळवाडी, जुवाटी, कोेंडवाडी यांचा समावेश आहे.
नद्यांमधीलही पाणी घटले(सध्याची पाणी पातळी मीटरमध्ये)जगबुडी - ३.४०वाशिष्ठी - ०.९०शास्त्री - ०.२०साेनवी - ०.००काजळी - ११.१८काेदवली - १.४०मुचकुंदी - ०.१०बावनदी - ०.९५