शिवाजी गोरे
दापोली : दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे.
महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी मेरिटाइम बोर्डाने प्रवासी सेवा सुरू केली असून, या सेवेचा आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे.
कोकणातील महामार्गावरील वाहतूक कोंडी पर्यटकांची डोकेदुखी बनली असून, महामार्ग अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्यावर दरवर्षी शेकडो निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. रस्त्यावरील ताण कमी करून पर्यायी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने मेरिटाइम बोर्डाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होऊन पर्यटनाला मोठी उभारी मिळणार आहे.दापोलीचे पर्यटन तज्ज्ञ माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी दाभोळ - धोपावे , तवसाळ - जयगड , वेसवी - बागमंडले , दिघी - आगरदांडा पाच खाड्यांवर फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी जोड मिळाली आहे.मुंबई -दाभोळ बोट सेवेचे दिघी बंदर येथे दिघी बंदर अधीक्षक अरविंद सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत मोकल, डॉ. विद्या मोकल यांनी स्वागत केले. मुंबई - दाभोळ अशी जाणारी रावे नावाची ही बोट 35 प्रवासी घेऊन आली आहे.