देवरुख : गेल्या दोन दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी असल्याने संगमेश्वरातील व्यापारीवर्गाने सावधानता बाळगली होती.संगमेश्वर तालुक्यामध्ये रविवारी सकाळपर्यंत पावसाची ११५.५८ मिलिमीटर इतकी नोंद झाली असून, धुवाधार झालेल्या पावसाने नदीकाठची शेती वाहून नेली होती. काही ठिकाणी पाण्यामुळे शेती झोपवली होती.संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने पूरसदृश स्थितीचा पाहणी दौरा देवरुखच्या तहसीलदार वैशाली माने यांनी दुपारी केला. पाण्याच्या धोक्याच्या पातळीबाबतची माहिती घेण्याकरिता संगमेश्वरचे मंडल अधिकारी पी. जी. सावंत आणि त्या मंडलातील तलाठी यांना तैनात ठेवण्यात आले होते.दरम्यान, संगमेश्वरातील मच्छी मार्केट, भाजी मार्केट आणि काही ठिकाणी बाजारपेठेला सकाळपासून ११ वाजेपर्यंत पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे तेथील वाहतूक आणि रहदारी काही काळ ठप्प होती. संगमेश्वरहून असुर्डेला जाणाऱ्या पुलाभोवती पाण्याचा वेढा सकाळी ११ वाजेपर्यंत असल्याने येथील रहदारी थांबली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. लोवले मयुरबाग येथील शेती पूर्णत: नदीच्या पाण्याखाली गेली होती. हीच परिस्थिती बावनदीच्या काठावर असलेल्या शेतीमध्ये होती. दरम्यान, पावसाची उघडीप सायंकाळी असल्याने अन्य ठिकाणातील पूरसदृश स्थिती मात्र टळली आहे. (प्रतिनिधी)
संगमेश्वर बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी
By admin | Published: August 31, 2014 10:59 PM