राजापूर : तालुक्यात दमदार पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेले धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे या धबधब्यांवर जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यटनप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
राजापूर तालुका हा निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. पावसाळ्यात तर हे सौंदर्य अधिकच बहरून येते. पावसाळा सुरू होताच तालुक्यात विविध ठिकाणी डोंगरकड्यांतून ओसंडून वाहणारे धबधबे हे पावसाळी पर्यटनासाठी सज्ज होतात. चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा, धोपेश्वरच्या श्री धुतपापेश्वर मंदिर परिसरातील कोटीतीर्थ धबधबा, सौंदळ, ओझर, काजिर्डा, हर्डी येथील धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. दरवर्षी याठिकाणी हौशी पर्यटकांची गर्दी होते.
यावर्षी पावसाचे वेळेआधीच आगमन झाल्यामुळे हे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पण गतवर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने या धबधब्यांवर प्रवेशासाठी पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला आहे.