लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. यावर्षी जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये ८६४ जागा उपलब्ध असून, यासाठी ८१२ पालकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. लवकरच याची सोडत काढण्यात येणार आहे. मात्र, उपलब्ध जागेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. यावर्षी प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २६९ जागा आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील ९० शाळांमध्ये ९३४ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत शाळांची संख्या वाढली असल्याने जागाही वाढल्या आहेत. मात्र, तुलनेने अर्ज कमी आल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी कोणताही अडसर येणार नाही.
आरटीई प्रवेशासाठीची सोडत एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात काढण्यात येण्याची शक्यता आहे. ऑनलाईन लॉटरी सोडतीद्वारे प्रवेश जाहीर केले जाणार आहेत.
प्रवेश प्रक्रिया लवकर
ऑनलाईन लॉटरी सोडतीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शाळेत जाऊन पालकांनी करावयाची असून, त्यानंतर प्रवेश निश्चित केला जाणार आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर, वेळेवर पार पाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये ८६४ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ८१२ अर्ज प्राप्त झाले असल्याने प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील मानांकित व मोठ्या काही शाळा आहेत. या शाळांमध्ये २५ टक्के जागा आरटीईअंतर्गत असल्या तरी आपल्या पाल्याचा नंबर लागेल का? असा प्रश्न होता. मात्र, यावर्षी एकूण जागेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. त्यामुळे प्रवेश मिळेल अशी आशा आहे.
- दिपेश पाटील, पालक
ऑनलाईन पद्धतीने मुलासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, जिल्ह्यात एकूण शाळा व उपलब्ध जागा याचा आढावा घेता आलेले अर्ज कमी आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळेलच असे नाही. लॉटरी पद्धतीने सोडत काढतानाही, नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे.
- संदीप, रेमणे, पालक
आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या शाळेत आपल्याला पाल्याच्या इच्छेप्रमाणे प्रवेश घेता येत नाही. मात्र, आरटीईंमुळे प्रवेश फायदेशीर आहे. या पद्धतीने जर माझ्या पाल्याला प्रवेश मिळाला तर यापेक्षा समाधानाची बाब वेगळी असणार नाही. लवकर प्रवेश प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
- रूपल देवरूखकर, पालक
तालुका शाळा जागा
मंडणगड ०५ २०
दापोली १५ ९९
खेड १३ १७२
चिपळूण १९ १७५
गुहागर ०५ ४१
संगमेश्वर १० ४३
रत्नागिरी १९ २६९
लांजा ०४ १९
राजापूर ०५ २६