असगोली : पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पाहणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केली. त्यावेळी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी पाठपुरावा करतो, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे संपर्क क्रमांक तहसीलदारांकडे द्या, अशा सूचनाही डॉ. पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.
काही तांत्रिक कारणांमुळे गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. गुहागरसोबतच मंजूर झालेल्या अन्य प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये गुहागरच्या प्रकल्पाचाही समावेश होता. मात्र, प्रकल्पच पूर्ण न झाल्याने उद्घाटन समारंभातून हा प्रकल्प वगळण्यात आला. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील गुहागरच्या दौऱ्यावर होते. तहसीलदार कार्यालयातील आढावा बैठक संपल्यावर डॉ. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जतिन आणि डॉ. शशांक ढेरे यांनी सांगितले की, ऑक्सिजन प्रकल्पाचे काम पूर्ण आहे. फक्त प्रकल्पात तयार होणारा ऑक्सिजन रुग्णालयात नेण्यासाठीच्या वाहिनीचे काम अपूर्ण आहे. ठेकेदार ही वाहिनी जमिनीखालून रुग्णालयात नेणार होता. मात्र, ही वाहिनी प्रकल्प इमारतीच्या छतावरुन रुग्णालयात आणण्याची सूचना आम्ही केली आहे. हे काम करण्यास ठेकेदार आलेला नाही. त्यावर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे क्रमांक तहसीलदारांकडे द्या, मी त्याचा पाठपुरावा करतो, असेही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.