रत्नागिरी : संगमेश्वर येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काेविडच्या स्थितीचा आढावा राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी शुक्रवारी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडून घेतला. आगामी काळात याबाबत घ्यायच्या खबरदारीबाबत त्यांनी निर्देश दिले आणि शासनातर्फे लागेल ती मदत तत्काळ उपलब्ध करून देऊ, असेही सांगितले.
जिल्ह्यामध्ये नवीन प्रकारच्या बदल झालेल्या विषाणूच्या बाधेमुळे नऊ रुग्ण आढळल्याची माहिती होती. यापैकी आठ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. तथापि, एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला संगमेश्वर तालुक्यामधील रहिवासी होती. महिलेला इतरही गंभीर प्रकारचे आजार झालेले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी दिली.
संभाव्य स्थिती लक्षात घेऊन आगामी काळात नियोजन करून त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. याबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी माहिती पालकमंत्री परब हे जिल्हा प्रशासनाकडून घेत असून, पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून याबाबतीत सतत मार्गदर्शन त्यांच्याकडून प्राप्त होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले ग्रामपंचायत स्तरावरील विलगीकरण कक्ष आणि तेथील सुविधा तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये असणारा ऑक्सिजनचा साठा याबाबतही पालकमंत्री परब यांनी माहिती घेतली.