अण्णांच्या गावच्या वारीमुळे अनेक वेळा त्यांना जातू होता आले नाही. काही वर्षांनंतर ते बॉम्बे डाइंग मिलमध्ये जातू झाले.
माझी आई सुमती ही पूर्वाश्रमीची नकुबाई. आईचे नकुबाई हे नाव का ठेवले, माझ्या आईच्या दोन बहिणी होत्या. रेवू व चेवू अशी त्यांची नावे होती. या दोघींनंतर आईच्या बाबांना मुलगा हवा, पण आईचा जन्म झाला. त्यामुळे आई तिच्या बाबांना नको असलेली मुलगी होती. म्हणून तिचे नाव नकुबाई ठेवले होते. तरीही आईच्या दोन्ही बहिणी आईवर जीवापाड प्रेम करायच्या. नकुबाई माझी आई साडवली या गावात आली आणि तिने या गावांमध्ये नंदनवन फुलवले. कष्टाळू असणारी माझी आई शेतीमध्ये राबराब राबायची. वडिलांना तिची फार मोठी मदत होती. मनाने कणखर व धीट असणारी आई स्वाभिमानी होती. तिने या वर्षी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आहेत, तरीही ती स्वावलंबी आहे. या वयातही ती जेवणापासून सर्व गोष्टी स्वतः करते. शरीराने थकली असली, तरी मनाने ती कणखर आहे. त्यामुळे आजही स्वाभिमानी जीवन जगत आहे. तिने आम्हा नऊ भावंडांना सांभाळताना जीवनातले अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेक संकटावर तिने मात केली आहे. दारिद्र्य, दुष्काळ यांना सामोरे गेली आहे. आज तिची नातवंडे आजीचे काळेभोर केस, खणखणीत दात पाहून आजीचा हेवा करतात़. आजीबरोबर गप्पा मारायला नातवंडांना खूप मजा वाटते. त्यांना आजी हवीहवीशी वाटते. गावातील अनेक बाळंतिणीचे सुईणपण आईने केले आहे. त्यामुळे गावातील लहानथोर सर्वच मंडळी आईला आदराने मान देतात.
अनेक वर्षे सुखाने चाललेल्या आमच्या आईअण्णांच्या संसारात अचानक काळे ढग जमा झाले. अण्णांची मिल बंद पडली. मिलचा संप झाला. तो काही केल्या मिटेना. दत्ता सामंत व सरकार यांच्यात समन्वय झाला नाही. मिल कामगार रस्त्यावर आले. ते देशोधडीला लागले. मुंबईचा आत्मा मिल कामगार संपला, पण आमचे आण्णा डगमगले नाहीत, त्यांनी फुलांचा पिरतीचा धंदा सुरू केला. मिल कामगारमधून ते फुलवाले झाले. आजही त्यांची ओळख ‘फुलवाले मामा’ म्हणून कुर्ल्यामध्ये आहे. धंद्यामध्ये आण्णांनी चांगलाच जम बसला होता, पण एके दिवशी दुःखाचा डोंगरच आमच्या कुटुंबावर आला. आण्णा पहाटे पाच वाजता रस्त्याच्या एका बाजूने फुले आणण्यासाठी दादरच्या मार्केटला जात होते. तेवढ्यात एका भरधाव मोटारीने अण्णांना धडक दिली. अण्णांच्या पायावरून मोटारीचे एक चाक गेले. आण्णा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आण्णांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिकडे आईला ही गोष्ट कळताच, आईने अन्नपाणी टाकले. आई वाघजाई पावणाईला याचना करू लागली. वाघजाई देवीच्या कृपेने अण्णांचे ऑपरेशन यशस्वी झाले. अण्णांच्या पायात उजव्या पायात सळी टाकण्यात आली. काही दिवसांनी अण्णांना गावी आणण्यात आले. आता संसाराची सर्व जबाबदारी आईवर पडली होती, पण आई डगमगली नाही. तिने कंबर कसली. पुन्हा नव्या जोमाने ती कामाला लागली. या वर्षी तिने भाताची दोन शेते व नाचणीचा एक रोपटा आणखी वाढविला. ती संकटाने खचून गेली नाही. ती नेहमी सांगते, ‘‘बाबांनो, कधी कुणाची लांडीलबाडी करू नका, कष्टाने आपली भाकरी मिळवा. कष्टाची भाकरी ही लई गॉड असते.’’ आमच्या आईने आम्हाला लहानपणापासूनच संस्काराचे बीज दिले. शिक्षणाचे महत्त्व समजावले. त्यामुळेच आज आम्ही सर्व भावंडे स्वतःच्या पायावर उभी आहोत. ती आजही जात्यावर दळताना जात्यावरच्या ओव्या गाते. तिच्या अनेक ओव्या पाठ आहेत. या ओव्या ऐकताना त्या काळच्या गरिबीची आठवण होते. दुष्काळाचे दिवस आठवतात. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी पीयूषा आर्ट डायरेक्टर म्हणून काम करते. ती आजीच्या ओव्या रेकॉर्ड करते. आजीच्या जीवनावर एक शॉर्ट फिल्म करण्याचा तिचा मनोदय आहे. सर्व नातवंडांना आजी-आजोबा हवेहवेसे वाटतात.
आमचे अण्णा आजही टीव्हीवरील बातम्या आवडीने पाहतात. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक जवळचे अनुभव ते सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते चाहते आहेत. मोदींच्या प्रत्येक कामाची ते भरभरून स्तुती करतात. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ अण्णांचा आवडता चित्रपट. उरी हल्ल्यानंतर अण्णा बेचैन झाले होते, पण ‘सर्जिकल स्ट्राइक’ झाल्यावर अण्णांना खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या सैनिकांची खूप प्रशंसा केली. आज ९६व्या वर्षातही जगातील अनेक नवनवीन गोष्टींची अण्णा माहिती घेत असतात. त्यांना समाजकारण व राजकारण या दोन्ही गोष्टीत रस आहे.
गेल्या वर्षी पुणे येथे स्वरकूल संस्थेमार्फत आई-अण्णांच्या सामाजिक योगदानाबाबत ‘श्रीमंतयोगी राष्ट्रीय पुरस्काराने’ विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व त्यागराज खाडिलकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. त्यांचे वय ऐकून सर्वच मान्यवर अवाक झाले.
गरिबी, दुष्काळ, दारिद्र्य, कोरोना महामारी या सर्व गोष्टींवर मात करीत, आई-अण्णांनी जीवनातील जी एक उंची गाठली आहे, त्याचा हेवा अनेकांना वाटतो. समाधान हेच त्यांच्या आरोग्यदायी जीवनाचे सार आहे. अनेक दाम्पत्यांना त्यांची ही जगण्यातील श्रीमंती मार्गदर्शक ठरणारी आहे.
- संतोष दत्ताराम जाधव, चिपळूण.