लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : काेकणात शिमगाेत्सवाला सुरुवात झालेली असतानाच काेराेनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे शिमगाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करून गुहागर तालुक्यातील खेळकरी गावभाेवनीसाठी बाहेर पडले आहेत. काेराेनामुळे खेळकरी ताेंडाला मास्क लावूनच बाहेर पडत आहेत. नमन मंडळांनी आपल्या खेळ्यातील खेळकऱ्यांची संख्याही २५ पेक्षा कमी ठेवली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गुहागर तालुका सज्ज झाला आहे.
कोकणातील शिमगोत्सवाचे दोन भाग असतात. एक म्हणजे मोठ्या होळीपर्यंत चालणारा शिमगोत्सव आणि त्यानंतर गावागावांत सुरू होणारा पालखी महोत्सव. शिमगोत्सवात संकासुर, राधा आणि अन्य सोंगे असलेली नमन मंडळे मोठ्या होळीच्या आधी गावभोवनीला बाहेर पडतात. परंपरेने ठरलेल्या गावात ही नमन मंडळे घरोघरी जातात. तेथेही परंपरेने कोणती घरे घ्यायची याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. काेराेनाच्या नियमावलीमुळे गावागावांत संकासुर येणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कोकण नमन लोककला मंचाने शासनाची नियमावली पाळून खेळे गावभोवनीला बाहेर पडतील असा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार फाल्गुन पंचमीला (फाक पंचमी) खेळकऱ्यांनी आपल्या ग्रामदेवतासमोर ढोलकीवर थाप मारली. होळीसमोर खेळे केले आणि २० मार्चपासून नमन मंडळे गाव भोवनीला बाहेर पडली आहेत. मात्र, कोरोनाविषयक नियमावलीचे पालन व्हावे म्हणून सर्व नमन मंडळे यावेळी मास्क आणि उपस्थितीबाबत जागरूक आहेत. खेळकऱ्यांची संख्या २५ पेक्षा जास्त राहू नये म्हणून आळीपाळीने खेळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. काही नमन मंडळांनी एकाच रंगाचे मास्क शिवले आहेत. त्यामुळे मास्क हादेखील वेशभूषेचाच भाग बनून गेला आहे.