खेड : कोरोनापाठोपाठ आता बदलत्या हवामानाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरू असतानाच कधी पाऊस, तर कधी मळभ अशा संमिश्र वातावरणाचा त्रास नागरिकांना होत आहे. या वातावरणामुळे आजारपणात अधिक वाढ होऊ लागली आहे.
निर्जंतुकीकरण मोहीम
देवरुख : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे वाडीत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच बाहेरून येणाऱ्यांसाठी तपासणी सक्तीची करण्यात येत आहे.
गरजूंना मदत
सावर्डे : लॉकडाऊनमुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. सामान्य जनतेचा रोजगार ठप्प झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडून मदतीचा ओघ सुरू करण्यात आला आहे. अनेक गरजूंना यादव यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.
भाजवळीला प्रारंभ
लांजा : तालुक्याच्या बहुतांश भागातील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या भाजावळीच्या कामात गुंतलेले आहेत. शेतीमध्ये आधुनिकता आली असली तरी अजूनही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. सध्या तालुक्याच्या अनेक भागात भाजावळीला मोठ्या प्रमाणावर प्रारंभ झाला आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण
साखरपा : साखरपा, देवरुख, संगमेश्वर या राज्यमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण सुरू झाले आहे. ३२ किलोमीटर लांबीचा हा राज्यमार्ग ३२ कोटी रुपयांच्या केंद्र शासनाच्या विशेष निधीतून केला जात आहे. रस्ता डांबरीकरण, खडीकरण, नवीन मोऱ्या, लहान पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टँकरची मागणी
दापोली : एप्रिल महिन्याच्या अखेरीला तालुक्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील करजगाव, उटंबर, तामसतीर्थ, उन्हवरे, वावघर, वणौशी, पंचनदी, मुरुड, खेर्डी या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने या गावाने टँकरची मागणी केली आहे.
रुग्णवाहिका मंजूर
खेड : दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खेडमध्ये एक, दापोलीत दोन आणि मंडणगडमध्ये एक अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत.
किराणा मालाचे वाटप
साखरपा : कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या साखरपा-गोवरेवाडीच्यानजीक असलेल्या दख्खन गावातील २५ गरजू कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या किराणा वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. साखरपा, गोवरेवाडीतील ग्रामस्थ, मुंबई तरुण मित्रमंडळ आणि चेन्नई मंडळ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
पाणी योजनेचा आराखडा
रत्नागिरी : प्रत्येक ग्रामस्थाला प्रतिदिन ५५ लिटर पाणी मिळेल अशा प्रकारे पाणीपुरवठा योजना विभागाने ग्रामस्तरावर नियोजन करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासाठी जुन्या व नव्या योजनेचा मेळ घालून ग्रामपंचायतीने आराखडा तयार करावा, असेही प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
पावसाळ्यात धोका वाढला
मंडणगड : मंडणगड, बाणकोट मार्गावर शिपोळे ते वेसवी गावाच्या अंतरावरील रस्त्यावर महामार्गानजीक असलेल्या मोऱ्या खचल्या आहेत. या धोकादायक मोऱ्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोरीच्या बाजूचा रस्ता खचला आहे. मात्र, याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे.