रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर घेतला, असे वाटू लागले आहे. मात्र, रात्री जाेरदार पडलेल्या पावसानंतर शुक्रवारी दिवसभर वातावरण पावसाळी वाटत असले, तरी त्यातुलनेने पाऊस कमीच आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर घेतला हाेता. तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामाने जिल्ह्यात चांगलीच सुरुवात केली होती. त्यामुळे या काळात सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. परिणामी शेतीची कामेही मार्गी लागली आहेत. त्यानंतर दिवसभर ऊन आणि रात्रभर मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसाचा हा जोर कायम राहील, असे वाटत होते. परंतु गेल्या दोन - तीन दिवसांपासून पाऊस अतिशय कमी झाला आहे. दिवसातून किरकोळ येणारी सर वगळता कडक उन्हाला सुरुवात झाल्याने उकाडाही वाढला होता.
पुन्हा बुधवारपासून पावसाने रात्री हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत हाेता. शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पुन्हा तो कमी झाला. दिवसभर पावसाचे वातावरण कायम होते; मात्र पाऊस तुरळक पडत होता. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाश मेघांनी अच्छादून आल्याने पाऊस जोरदार सुरू होण्याची शक्यता वाटत होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ३५२.९० मिलिमीटर (सरासरी ३९.२१ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाने जिल्ह्यात कुठेही नोंद झाल्याची घटना नाही.
शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्यासुमारास भोस्ते घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परंतु बांधकाम विभागाने ती दूर केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे.